रामेश्वर बोरकर
राज्यात पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून मदतीसाठी देवस्थाने, सरकारी कर्मचारी व नागरिक पुढे सरसावत आहेत. अशा कठीण काळात नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील माटाळा या लहानशा गावातील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर सुभाषराव शिंदे यांनी आपल्या पत्नीचे दागिने मोडून तब्बल ५१ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी केली आहे. त्यांच्या या स्तुत्य कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मूळचे माटाळा येथील असलेले ज्ञानेश्वर शिंदे सध्या यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सामाजिक भान जपत ते नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी पुढे असतात. दरम्यान पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून अनेक ठिकाणी मदतीचा ओघ सुरू आहे. या संकटात आपलाही खारीचा वाटा असावा या विचाराने प्रेरित होऊन ज्ञानेश्वर शिंदे यांनी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला.
मात्र तात्काळ मोठी रक्कम उपलब्ध नसल्याने त्यांनी पत्नी प्रगती शिंदे यांच्याशी चर्चा केली. पत्नीनेही दिलदारीने प्रतिसाद देत अंगावरील दागिने मोडून देण्याची तयारी दर्शवली. दागिने मोडून व स्वतःजवळील रक्कम मिळून त्यांनी एकूण ५१ हजार रुपये जमा केले. ही रक्कम त्यांनी महागाव तहसील कार्यालयात सुपूर्त करण्यासाठी २ ऑक्टोबर (गुरुवार) रोजी भेट दिली मात्र सुट्टीमुळे तहसीलदारांनी ३ ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी येण्यास सांगितले.
आज अनेक ठिकाणी दागिन्यांवरून नवरा-बायकोत वाद उद्भवताना दिसतात परंतु प्रगती शिंदे यांनी एका शब्दात अंगावरील दागिने देण्यास होकार दिला ही बाबही समाजात प्रेरणादायी ठरत आहे. या कुटुंबाने दाखवलेल्या त्यागवृत्तीचा आणि सामाजिक जाणीवेचा सर्वत्र गौरव केला जात आहे.