Pune : शेतकरीमहिलांसोबत दीर्घ काळ काम करणाऱ्या महिला किसान अधिकार मंच (मकाम) आणि सोपेकॉम यांच्या वतीने 'भविष्य पेरणाऱ्या' हे विविध कलामाध्यमांतील एक अनोखे प्रदर्शन पुण्यात भरवण्यात येत आहे. महिला शेतकऱ्यांचा सन्मान आणि जागर करण्याच्या हेतूने या ३ दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनात काय आहे?
शेतकरी, ऊसतोड कामगार महिलांच्या वास्तव जीवनावर आधारित फोटो, शॉर्ट फिल्म, आणि पोस्टरचा समावेश आहे. यासोबतच शेतीतील कामे, महिलांचे श्रम याच्याशी निगडित उपक्रम आहेत. या प्रदर्शनामध्ये भेटी देणाऱ्यांना शेतकरी महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधता येणार आहे.
या कार्यक्रमात २२ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत 'धग असतेस आसपास' या कवितासंग्रहातील कवितांचे काव्यवाचन केले जाणार आहे. यासोबतच 'पुष्कळा' या शेतकरी महिलांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशनही केले जाणार आहे. 'बीज अंकुरे अंकुरे' हा चित्रपटही या कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहे.
यासोबतच २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जेष्ठ पत्रकार आणि पीपल्स अर्काईव्ह ऑफ रूरल इंडियाचे (PARI) संस्थापक पी. साईनाथ यांचे महिला, शेती आणि काम या विषयावर व्याख्यान असणार आहे.
कुठे आणि केव्हा?
हे प्रदर्शन २१ ते २३ मार्च २०२५ या ३ दिवसांत होणार असून कोथरूड येथील एरंडवणे परिसरात असलेल्या दि बॉक्स संकुल येथे पार पडणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत प्रदर्शन पाहता येणार आहे.