शासनाच्या माध्यमातून गरजू लोकांना मोफत धान्याचा लाभ दिला जातो. त्यात अधिक पारदर्शकता येण्यासाठी हातांच्या बोटांचा थम घेतला जात होता. त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या; त्यामुळे डिसेंबर महिन्यात होत असलेल्या धान्य वाटप हे डोळ्यांचे स्कॅन करून करण्यात येत आहे, त्याची सुरुवात नुकताच शामगाव (ता. कराड) मध्ये करण्यात आली.
शासनाच्या माध्यमातून गरजू लोकांना मोफत धान्य पुरवठा केला जातो. त्यासाठी लाभार्थ्यांना उत्पादनाची अट आणि काही नियम आहेत. त्यानुसार वाटप प्रत्येक महिन्याला केले जाते. त्यामुळे प्रामुख्याने तांदूळ, गहू आदींचा समावेश आहे. काहीवेळा त्यामध्ये अधूनमधून बदल केले जातात. कधी हायब्रीड तर कधी साखर असते.
ऑनलाइन पद्धतीने त्याची नोंद होण्यासाठी व त्यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी शासन सतत बदल करत असते, यापूर्वी असे अनेक बदल केले आहेत. पूर्वी नोंद वहीत लिखित माहिती होती. नंतर हाताचे थम घेत असताना अडचणी निर्माण होत होत्या.
त्यामध्ये अनेक लाभार्थ्यांच्या हातांच्या बोटांचे ठसे उमटत नव्हते. कामामुळे हाताच्या रेषा पुसट झाल्या होत्या. सध्या डोळे स्कॅन करून धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वेळ वाचत असून, स्कॅनला उशिरा लागत नाही.
ताटकळत बसावे लागणार नाही!
स्कॅन झाल्यानंतर तुमचे धान्य किती आहे, तुम्हाला मिळाले, असा संदेश मोबाइलवर प्राप्त होत आहे. त्यामुळे धान्य दुकानदार व लाभार्थ्यांना ताटकळत बसावे लागत नाही.
रेशनिंग दुकान चालकांकडून समाधान...
• ग्रामीण भागातील रेशनधारक लाभार्थी शेतातील कामे करतात. त्यामुळे त्यांच्या हाताच्या बोटावरील रेषा खरबडीत झाल्याने थम येत नव्हते.
• त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. सध्या आय स्कॅनरला सुरुवात झाल्याने वेळ लागत नाही. त्यामुळे लाभार्थी तसेच रेशनिंग दुकान चालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
हाताच्या बोटांच्या रेषा पुसट झाल्याने थम लवकर घेता येत नव्हता. त्यामुळे भरपूर वेळ लागत होता. या महिन्यातील धान्य वाटप करताना आय स्कॅनरची सुरुवात केल्याने झटपट कामास सुलभ होत आहे. - सुनील गायकवाड, धान्य दुकानदार, शामगाव , ता. कराड जि. सातारा.
