अजय पाटील
जळगाव जिल्ह्यात यंदा ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे. याउलट, हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत मात्र तब्बल १ लाख ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचा विमा काढण्यात आला आहे.
पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी एमआरसॅक सॅटेलाइटद्वारे क्षेत्राची अचूक पडताळणी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कृषी विभागाची आकडेवारी आणि विमा काढलेल्या क्षेत्रात थेट २८ हजार हेक्टर क्षेत्राचा फरक दिसून येत आहे.
जिल्ह्यात सरासरी केळीची लागवड ६० ते ७० हजार हेक्टर क्षेत्रावर होते. यंदा चांगल्या पावसामुळे लागवड क्षेत्रात वाढ - झाली असली तरी, ती केवळ ५ ते १० हजार हेक्टरच्या आसपास असण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.
जिल्ह्यात यंदा केळीची ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे, तसेच चांगला पाऊस व इतर कारणांमुळे हे क्षेत्र ८० हजार ८५ हजार हेक्टरपर्यंत जाऊ शकते. अनेक तालुक्यांमध्ये केळीची लागवड आता वाढली आहे. - कुर्बान तडवी, जिल्हा कृषी अधीक्षक.
क्षेत्र वाढले मात्र, ते ३० हजार हेक्टरने शक्य नाही...
• कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही कारणास्तव केळीचे क्षेत्र वाढले असेल, ते प्रमाण ५ ते १० हजार हेक्टरने वाढू शकते. मात्र, २५ ते ३० हजार हेक्टर क्षेत्र वाढणे शक्य नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
• रावेर, जळगाव, चोपडा, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, बोदवड या तालुक्यांपेक्षा इतर तालुक्यांतही केळीची लागवड वाढली आहे, मात्र, हे क्षेत्र एकूण १ लाख हेक्टरपर्यंत वाढू शकत नाही, असे कृषी विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एमआरसॅक सॅटेलाइटद्वारे पडताळणी करा...
• या गंभीर तफावतीनंतर कृषी विभागाने विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात खरोखरच केळी पीक आहे का? याची पडताळणी सुरू केली आहे.
• या पडताळणीतून क्षेत्रातील वाढ खरी आहे की केवळ कागदोपत्री आहे, हे स्पष्ट होणार आहे.
• दरम्यान, या पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी, शेतकऱ्यांकडून एमआरसॅक सॅटेलाइटद्वारेक्षेत्राची अचूक पडताळणी करण्याची मागणी केली जात आहे.
पील बाग राहिल्याने वाढू शकते क्षेत्र...?
• केळीला भाव नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदेबाग काढून पील बाग कायम ठेवला, त्यामुळे केळीचे क्षेत्र वाढू शकते. पाऊस चांगला झाला, सर्व प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी आहे.
• त्यामुळे ज्या तालुक्यांमध्ये केळीची लागवड कमी होती, अशा तालुक्यांमध्ये केळीची लागवड क्षेत्र वाढलेच आहे. यामुळेही विम्याच्या आकडेवारीत क्षेत्र वाढलेले असेल अशीही शक्यता आहे.
