मागील वर्षभरात कांद्याचे बाजारभाव सतत उत्पादन खर्चापेक्षा कमी राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सतत तोट्यात शेती करावी लागत असल्याने यंदा बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यासह परिसरात उन्हाळी कांद्याची लागवड घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कांद्याच्या उत्पादनासाठी बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी, पाणी व वीज यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, बाजारात कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. अनेक वेळा प्रतिक्विंटल कांद्याचे दर उत्पादन खर्चापेक्षा कमी राहिल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
याशिवाय यंदाच्या हंगामातही कांद्याच्या दरात फारशी सुधारणा न झाल्याने अल्प प्रमाणात शेतकरी उन्हाळी कांद्याची लागवड टाळण्याच्या तयारीत आहेत. तर काही शेतकरी कांद्याऐवजी हरभरा, ज्वारी किंवा भाजीपाला आदी रब्बी पिकांकडे वळण्याचा विचार करीत आहेत.
२०२५ वर्ष उत्पादकांसाठी तोट्याचे ठरले!
• कांदा उत्पादकांसाठी २०२५ हे वर्ष आर्थिक दृष्ट्या अत्यंत तोट्याचे ठरले आहे. रब्बी हंगामातील कांद्याची आवक सुरू झाल्यापासून बाजारभाव सातत्याने घसरत राहिले.
• फेब्रुवारी २०२५ मध्ये राज्यातील सरासरी कांदा भाव २,१०० रुपये प्रतिक्विंटल इतका होता. मार्च महिन्यात कांद्याची आवक वाढल्याने दर घसरून १५०० रुपये प्रतिक्विंटल झाला.
• सप्टेंबर महिन्यात कांद्याचा भाव सर्वात कमी १,१०० रुपये प्रतिक्विंटल नोंदविण्यात आला. नोव्हेंबरमध्ये सरासरी भाव फक्त १,२०० रुपये प्रतिक्विंटल इतका राहिला.
• या सततच्या दरघसरणीचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला आहे.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
