Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कांदा लागवड महागणार? कांदा रोपांसाठी शेतकऱ्यांची डोंगराळ भागात भटकंती; दरही वाढले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:34 IST

Onion Farming : अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे लाल, उन्हाळ कांदा रोपांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले कांदा बियाणे अतिवृष्टीने जमिनीत सडल्याने शेतकऱ्यांची डोंगराळ भागात रोपांची शोधाशोध सुरू आहे.

अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्यांचे लाल, उन्हाळ कांदा रोपांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांनी टाकलेले कांदा बियाणे अतिवृष्टीने जमिनीत सडल्याने शेतकऱ्यांची डोंगराळ भागात रोपांची शोधाशोध सुरू आहे.

डोंगराळ, मुरमाड जमिनीवर वाचलेली रोपे ही महाग घ्यावी लागत आहे. एक एकर कांदा रोपांसाठी तीस हजाराचा भाव असल्याने शेतकरी कांदा रोपांसाठी भटकंती करत आहेत.

शेतकऱ्यांच्या शेतात टाकलेले कांदा बियाणे पाणी साचल्याने सडून गेले. तर काही शेतकऱ्यांना पावसामुळे कांदा बियाणे टाकताच न आल्याने जमीन पडीक राहिल्या आहेत. शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्यावर बियाणे टाकल्याने लागवड उशिरा होणार आहे.

रोपे झाली महाग

डोंगराळ, मुरमाड जमिनीवर वाचलेली रोपे ही महाग घ्यावी लागत आहे. एक एकर कांदा रोपांसाठी तीस हजाराचा भाव असल्याने शेतकरी कांदा रोपांसाठी भटकंती करत आहेत. रोपांचा शोध शेतकरी वर्गाला घ्यावा लागत आहे.

मी दोन पायली कांद्याचे बियाणे टाकले होते. कांद्याच्या रोपाचे भावदेखील एकरी तीस हजार झाल्यामुळे कांद्याची लागणच अशक्य झाली आहे. याचा परिणाम भविष्यात कांद्याच्या लागवडीवर होणार आहे. - किशोर शिंदे, शेतकरी, जळगाव नेऊर ता. येवला जि. नाशिक.

कांदा रोपांचे आगार

पालखेड डावा कालव्याच्या लाभक्षेत्र खालील जवळपास नव्वद टक्के रोपांचे नुकसान झाले. त्यामुळे येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील नगरसुल, देवदरी, कोळगाव, राजापूर, ममदापूर भागात लाल कांदा रोपे विक्रीला असल्याने या भागात शेतकरी रोपांची शोधाशोध करत आहे.

कांद्याला फाटा, उन्हाळी मका लागवड

उन्हाळ कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. कांदा रोपांचे बाजारभाव बघता अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मका, गहू पिकांना पसंती दिली आहे. त्यामुळे भविष्यात कांदा लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : नोकरीला नाकारत विठ्ठलरावांनी धरली शेतीची वाट; भाजीपाला शेतीतून ३ एकरांत कमावले उत्पन्न २८ लाख

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकांदानाशिकबाजारमार्केट यार्ड