अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरीसह सर्कलमधील अनेक गावांमध्ये तसेच जंगलालगतच्या शेतांमध्ये रानडुक्कर व निलगाय यांसारख्या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धुडगूस सुरू असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
वन्यप्राणी अन्नाच्या शोधात रात्री शेतांमध्ये घुसून कापूस, हरभरा तसेच काढणीस आलेल्या उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करीत आहेत.
विशेषतः रानडुक्कर रात्रीच्या वेळी टोळ्यांनी शेतात शिरून पिके उद्ध्वस्त करीत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दिवसभर शेतात मेहनत करूनही रात्री पिकांच्या संरक्षणासाठी जागरण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उभी पिके डोळ्यादेखत नष्ट होत आहेत.
ज्वारी पिकाची पेरणीच बंद
डुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाची पेरणीच बंद केली असल्याचे चित्र आहे. सततच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
'उपाययोजना करा!'
वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, नुकसानीची पाहणी करून योग्य भरपाई द्यावी व या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
डुक्कर, नीलगाय, हरिण, वानर आदी वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे रात्री-अपरात्री शेतीची रखवाली करूनही पिकांचे नुकसान होत आहे. शासनाने सर्व शेतकऱ्यांना तारेचे कुंपण अनुदानावर उपलब्ध करून द्यावे. - संतोष अवघाते, शेतकरी, दुर्गवाडा.
मी माझ्या शेतात हरभरा पेरला तेव्हापासून सतत ३० दिवस शेतात रखवाली करूनही डुकरांनी हरभरा पिकाचे नुकसान केले. आता काय करावे हा प्रश्न मला पडला आहे. शासनाने झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी. - आकाश जामनिक, शेतकरी, लाखपुरी.
लाखपुरी परिसरात वन्यप्राणी शेतात घुसून पिकांची नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे. - मिनल नवघरे, माजी पं. स. सदस्या, लाखपुरी.
