उन्हाळ्यात उष्णतेचा फटका बसू नये, यासाठी आहार तज्ज्ञ फळे खाण्यावर भर देण्याचे सांगत आहेत. परंतु, फळांची कमतरता व मागणी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांकडून फळांमध्ये मोठ्या प्रमाणात घातक रसायनांचा वापर होत आहे. शहरातील अनेक व्यापारी फळे पिकविण्यासाठी कार्बन, कॅल्शिअम व इकॉन सारखे केमिकल वापरत आहेत. मात्र, हे आरोग्यासाठी हानिकारक असून, अन्न व औषध प्रशासनाकडून संबंधित व्यापाऱ्यांची तपासणीची मागणी होत आहे.
नैसर्गिक पद्धतीने फळे पिकविण्यासाठी किमान चार दिवस ते आठ दिवसांपर्यंत वेळ लागतो. परंतु, झटपट फळे पिकविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून विविध केमिकल वापरले जात आहेत. तसेच विविध प्रकारची फळे पिकविण्यासाठी सर्रासपणे कॅल्शियम कार्बोनेट पुड्या वापरल्या जातात. अशा फळांमुळे कॅन्सरसारख्या इतर दुर्धर आजारांची लागण होत असल्याचे यापूर्वीच निष्पन्न झाले आहे. अशा फळांच्या सेवनातून पोट बिघडणे, मळमळ, अपचन व पोटात गॅस तयार होतो. यामुळे उष्णतेच्या दिवसांत आंबे, केळी, पपई या फळांच्या पिवळ्या रंगावर जाऊ नये. तसेच टरबुजाच्या लाल रंगाला बळी पडू नये, असे आवाहन आहार तज्ज्ञ करत आहेत.
इंजेक्शन देऊन, केमिकल पाण्यात बुडवून किंवा कॅल्शियम कार्बोनेट पुड्या वापरून बाजारात विक्रीस आलेली फळे खरेदी करू नये. कोणत्याही फळांचा अधिक गडद रंग असल्यास तो नैसर्गिक असेल असा भ्रम करून घेऊ नये. ग्राहकांकडून मागणी वाढल्याने तशाच प्रकारची फळे बाजारात येत आहेत. आपण आपल्या व कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. - डॉ. अमित बिस्वास, आहार तज्ज्ञ, बीड
विषबाधा होण्याचा धोका
केमिकलमिश्रित फळे सेवन केल्याने विषबाधा होण्याचा धोका वाढतो. मानवी शरीरासाठी कॅल्शिअम व इकॉन सारखे केमिकल हळूहळू धोका पोहोचू शकतात. रोगांचा प्रतिकार करण्यासाठी फळांचे सेवन केले जाते. परंतु, केमिकलमिश्रित फळांच्या सेवनातून ही शक्ती कमी होते. नैसर्गिकरीत्या पिकवलेले फळे खरेदी करण्यासाठी आहार तज्ज्ञ मार्गदर्शन करतात.