Join us
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीनुसार शेतकऱ्यांची बिले देताना साखर कारखान्यांचे गणित कशामुळे बिघडतंय; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 09:32 IST

देशभरात सध्या कारखान्यांना किरकोळ साखर विक्रीचा दर ३ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळत आहे. काही ठिकाणी हा दर ३६०० ते ३७०० रुपयांपर्यंत उतरला आहे.

पुणे : शेतकऱ्यांना उसापोटी दिले जाणारे बिल आणि कारखान्यांना साखर विकून मिळणारा दर यात मोठी तफावत निर्माण झाल्याने साखर कारखान्यांना तीनशे रुपये प्रति क्विंटल तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे साखरेचा विक्रीदर वाढविण्याची गरज आहे.

त्यासाठी याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रीय तसेच राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा करू.

या प्रश्नाबाबत अनुकूल निर्णय होईल, याची काळजी घेऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, बी.बी. ठोंबरे, व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते पाटील उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील यांनी सुरुवातीला ऊस गाळप आणि साखर विक्री यावर वस्तुस्थिती मांडली. याबाबत केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरावरील साखर कारखाना महासंघाला सोबत घेऊन केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर पवार यांनी अमित शहा यांची वेळ घेऊन हा प्रश्न मांडू, असे आश्वासन दिले.

तसेच या भेटीदरम्यान शेतकऱ्यांसाठी अनुकूल निर्णय होईल, याची काळजी घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी साखर दरविक्रीबाबत चर्चा करण्यात आली.

केंद्र सरकारने १५ लाख टन साखरेच्या निर्यातीची परवानगी यापूर्वीच दिली आहे. तर पाच लाख टन निर्यातीबाबत तत्त्वतः मान्यता येण्याची शक्यता आहे.

मात्र, यात आणखी दहा लाख टन निर्यात करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निर्यात वाढल्यास किरकोळ विक्री दरात किमान शंभर रुपये प्रति क्विंटल दर वाढू शकतात, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले देशभरात सध्या कारखान्यांना किरकोळ साखर विक्रीचा दर ३ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळत आहे. काही ठिकाणी हा दर ३६०० ते ३७०० रुपयांपर्यंत उतरला आहे. तर कमी दर्जाच्या एस साखरेचा दर दर ३५०० पर्यंतदेखील आहे.

त्यामुळे बहुतांश साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार शेतकऱ्यांची बिले देताना विक्रीदर आणि एफआरपीतील तफावत २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटल इतकी झाली आहे.

त्यामुळे साखर कारखान्यांचे गणित बिघडल्याने कारखान्यांना आर्थिक फटका बसत आहे. या दरामध्ये वाढ होईल या दृष्टीने राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू असून, किमान विक्रीदर ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल करावा, अशी मागणी केली आहे.

महासंघाने शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेणे गरजेचे आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

अधिक वाचा: कोल्हापूर जिल्ह्यातील 'ह्या' कारखान्याचे ३ हजार ५६० रुपयाप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

English
हिंदी सारांश
Web Title : Sugar mills face losses disbursing FRP; seek government intervention.

Web Summary : Sugar factories struggle with FRP payments due to the gap between production cost and selling price. Industry leaders plan to meet with Amit Shah, seeking solutions like increased export quotas and a higher minimum selling price to alleviate financial strain.
टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीपुणेशरद पवारमंत्रीअमित शाहकेंद्र सरकारसरकार