सन १८८१ च्या फेमीन कमीशन ने शिफारस केल्यानुसार जुलै १८८३ मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. सद्यस्थितीत कृषी विभागाचे वापरले जात असलेले बोधचिन्ह व घोषवाक्य हे ३८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले आहे.
आधुनिक शेतीच्या दृष्टीकोनात व विभागाच्या कार्यपद्धतीत झालेल्या मूलभूत बदलांच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत असलेले बोधचिन्ह रचना/दृश्य व संवादात्मक ओळख कालबाह्य ठरू लागली आहे.
यामुळे सध्याच्या काळाशी सुसंगत, प्रभावी व सर्जनशील बोधचिन्ह व घोषवाक्य तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर अनुषंगाने बोधचिन्ह व घोषवाक्य अद्ययावत करण्यासाठी खुली स्पर्धा आयोजित केलेली होती.
जास्तीत जास्त प्रस्ताव प्राप्त होणेसाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक आवाहन (Call for Proposal) समावेशित करण्यात आले. वर्तमान पत्रामधून जाहिरात प्रसिद्ध करून तसेच कृषी विभागाच्या समाज माध्यमांतून प्रसिद्धी देण्यात आली.
तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी/प्राध्याप/संशोधक/कलाकार/डिझायनर्स/लेख/अभ्यासक/अधिकारी/कर्मचारी/इतर इच्छुक व्यक्तींनी आपली कलात्मक संकल्पना सादर करणेसाठी कला महाविद्यालये, कृषी विद्यापीठे यांना पत्र देऊन आवाहन करण्यात आले.
सदर स्पर्धेकरिता ७६१-बोधचिन्ह तर ९४९-घोषवाक्य कृषी आयुक्तालयास प्राप्त झाले. प्राप्त प्रस्तावांना मूल्यांकन व शिफारस करण्यासाठी मा.आयुक्त, कृषी यांच्या मान्यतेने बोधचिन्ह व घोषवाक्य मूल्यांकन व शिफारस समिती गठित करण्यात आलेली होती.
प्राप्त झालेल्या प्रस्तावांची प्रत्येक समिती सदस्याने तपासणी व छाननी करून त्यापैकी प्रत्येकी उत्कृष्ट दहा बोधचिन्ह व दहा घोषवाक्य शिफारस केले.
सदर समितीने शिफारस केलेल्या बोधचिन्ह व घोषवाक्य यांचे पुनर्निर्धारण करण्याबाबत मा.आयुक्त, कृषी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन अंतिम निवड होणेसाठी प्रत्येकी तीन बोधचिन्ह व घोषवाक्य शासनास शिफारस करण्यात आली.
शासनाने शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१२८/३-ए (ई-१२४१८६३) दिनांक ०७/११/२०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह व घोषवाक्य निश्चित करण्यात आले.
सदर शासन निर्णयानुसार, कृषी विभागामार्फत सद्यस्थितीत वापरण्यात येणारे बोधचिन्ह व घोषवाक्य यांच्या वापराऐवजी खालीलप्रमाणे बोधचिन्ह व घोषवाक्य वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यापुढे कृषी विभागाच्या सर्व उपक्रमामध्ये सदर शासन निर्णयाद्वारे जाहीर झालेले बोधचिन्ह व घोषवाक्य वापरण्यात येणार आहे. सदर बोधचिन्ह व घोषवाक्य हे कृषी विभागाची मालमत्ता असून त्या संबंधीचे सर्व हक्क कृषी विभागाकडे राहतील.
कृषी विभागाचे पूर्वी वापरात असलेले तसेच नवीन बोधचिन्ह व घोषवाक्य यांचा कोणीही गैरवापर केल्यास त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घेण्यात यावी.
बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा विजेते
बोधचिन्ह (Logo) विजेते
श्री. विरेंद्र भाईदास पाटील
क्रेझी क्रिएशन्स्, पहिला मजला, व्यंकटेश कॉम्प्लेक्स, दगडी पुलाजवळ, भुसावळ, जि. जळगाव
घोषवाक्य (Tagline) विजेते
श्रीमती सिद्धी भारतराव देसाई
रामदास नगर, कारेगाव रोड, परभणी
अधिक वाचा: तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? घरबसल्या चेक करा आता तुमच्या मोबाईलवर
