Join us

White Onion : परतीच्या पावसाने पांढऱ्या कांद्याची लागवड खोळंबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 13:43 IST

रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात पिकाला फटका बसला असताना पांढरा कांद्यालाही या पावसाची बाधा झाली आहे. परतीच्या पावसाने शेतजमीन ओली असल्याने या पिकाची लागवड खोळंबली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात पिकाला फटका बसला असताना पांढरा कांद्यालाही या पावसाची बाधा झाली आहे. परतीच्या पावसाने शेतजमीन ओली असल्याने या पिकाची लागवड खोळंबली असून ती आता डिसेंबरपासून सुरू होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

औषधी गुणधर्म असलेल्या पांढऱ्या कांद्यामुळे अलिबागला वेगळी ओळख आहे. तालुक्यात सुमारे २५० पेक्षा अधिक हेक्टरवर या पिकाचे क्षेत्र आहे. एक हजाराहून अधिक शेतकरी उत्पादक आहे.

चविष्ट व रुचकर अशी अलिबागच्या या पांढऱ्या सोन्याची ओळख आहे. कार्ले, खंडाळे, वाडगाव, सागाव, तळवली, नेहुली अशा अनेक भागात लागवड केली जाते. अलिबागच्या कांद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे.

या उत्पादनातून लाखो रुपयांची उलाढाल होते. दरवर्षी स्थानिकांसह पर्यटक अलिबागचा तो खरेदी करण्यासाठी येत असतात. अलिबागच्या पिकाला मुंबई, पुणेसह अनेक जिल्ह्यांत तसेच देशात प्रचंड मागणी आहे.

यंदा कृषी विभागाने बियाणे वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देण्याचे कबूल केले आहे. त्यामुळे यंदा पांढरा कांदा लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महिलांना रोजगारदोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत लागवड प्रक्रिया पूर्ण होते. कांदा तयार झाल्यावर कांदा शेतातून काढणे, तो सुकविणे, त्याच्या माळी तयार करणे, बाजारात विक्रीसाठी पाठविणे अशी अनेक प्रकारची कामे केली जातात. त्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो.

डिसेंबरचा मुहूर्तभातशेतीला पोषक असे वातावरण मिळाले आहे. परंतु, परतीच्या पावसामुळे भातशेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पांढऱ्या कांद्याला त्याची झळ पोहोचली असल्याची चिता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. परतीच्या पावसामुळे जमिनीत ओलावा राहिला आहे. ओलाव्यामुळे रोपे तयार होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

टॅग्स :कांदाशेतकरीलागवड, मशागतअलिबागशेतीपीकपाऊस