ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या प्रत्येक खर्चाची माहिती आता ग्रामस्थांना त्यांच्या मोबाइलवर सहज उपलब्ध होणार आहे. शासनाने सुरू केलेल्या 'ई-ग्रामस्वराज' पोर्टल आणि मोबाइल अॅपमुळे ग्रामस्थांना गावातील विकासकामांचा तपशील जाणून घेणे सोपे झाले आहे.
सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही यंत्रणा कार्यान्वीत असून, ग्रामस्थांना गावात कोणत्या कामावर किती निधी खर्च झाला याची माहिती घेऊन निधीचा योग्य वापर होत आहे का? याची तपासणी करता येणार आहे.
काही वर्षांपासून वित्त आयोगाद्वारे मोठा निधी ग्रामपंचायतींना मिळतो, मात्र हा निधी खर्च केला जातोय की नाही, तसेच कोणत्या कामांसाठी हा निधी खर्च केला जातो..?
याबाबतची माहिती ग्रामस्थांना मिळत नव्हती. त्यासाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेतून माहिती घ्यावी लागते. मात्र, आता नवीन सुविधा उपलब्ध केली असून, ग्रामस्थांनी याचा लाभ घेण्याची गरज आहे.
गावात काय काम सुरू?
◼️ या पोर्टलवर केवळ खर्चाचीच माहिती नाही, तर गावात सुरू असलेल्या विकासकामांची स्थितीही दिली जाते.
◼️ कामाचे नाव, मंजूर निधी, प्रत्यक्ष कामाला झालेला खर्च आणि कामाची सद्यःस्थिती अशी सर्व माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे.
◼️ त्यामुळे ग्रामस्थ सुरू असलेल्या कामावर लक्ष ठेवू शकतात
कुणालाही माहितीचा अॅक्सेस
◼️ ई-ग्रामस्वराज अॅप वापरण्यासाठी कोणत्याही खास लॉग-इनची किंवा पासवर्डची गरज नाही.
◼️ ही माहिती सार्वजनिक असून, ती कुणीही कधीही पाहू शकते. यामुळे ग्रामपंचायतीमध्ये पारदर्शकता राखण्यास मदत होते.
◼️ मात्र, या ठिकाणीही ही माहिती घ्यायला सहजासहजी कोणी जात नाही.
◼️ यामुळेच अनेकदा ग्रामपंचायतीच्या निधीचा वापर व्यवस्थित न होता, चुकीच्या पद्धतीने निधी खर्च होतो.
◼️ मात्र, 'ई-ग्रामस्वराज' पोर्टलमुळे ग्रामपंचायतीचा कारभार व निधी खर्चाची माहिती घरबसल्या मिळू शकणार आहे.
ई-ग्रामस्वराज पोर्टलवर अजून काय माहिती?
◼️ या पोर्टलवर ग्रामपंचायतीने वर्षभरात कोणत्या कामांचा आराखडा तयार केला आहे, याची माहिती मिळणार आहे.
◼️ ग्रामसभांमध्ये घेण्यात आलेले निर्णय आणि त्यावर झालेल्या चर्चाचा तपशील.
◼️ लोकसंख्या, गावाचे क्षेत्रफळ आणि निवडक प्रतिनिधींची माहितीदेखील मिळणार आहे.
ई-ग्रामस्वराजचा वापर कसा करायचा?
◼️ गुगल प्ले स्टोअरवरून 'ई-ग्रामस्वराज' अॅप डाउनलोड करा. अॅप उघडून 'ग्रामपंचायत' पर्याय निवडा.
◼️ राज्य, जिल्हा, तालुका आणि आपल्या ग्रामपंचायतीचे नाव निवडा. या ठिकाणी खर्चाचा, कामांचा तपशील दिसेल.
कुठून येतो निधी?
◼️ केंद्रीय आणि राज्य वित्त आयोगाचा निधी.
◼️ जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळणारा निधी.
◼️ विविध सरकारी योजनांसाठी मिळणारा विशेष निधी.
◼️ घरपट्टी आणि पाणीपट्टी या सारख्या स्थानिक करातून मिळणारे उत्पन्न.
अधिक वाचा: वनविभागाच्या 'त्या' जमिनींवर आता राज्य सरकारने घातले निर्बंध; खरेदी-विक्री करता येणार नाही