दत्ता पाटील
सांगली जिल्ह्यात विदेशी बेदाण्याची तस्करी होऊन बोगस शेतकऱ्यांच्या नावावर राजरोसपणे विक्री सुरू आहे. या विरोधात द्राक्ष बागायतदार संघाने तस्करीचा भांडाफोड केला आहे. शासनाला जाग आणण्यासाठी २० जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
शेतकरी व बेदाणा उत्पादकांसाठी द्राक्ष बागायतदार संघाने एल्गार पुकारला असला, तरी बाजार समित्यांनी संधीसाधू भूमिका घेत मौन धारण केले आहे. तर दुसरीकडे धोरणात्मक निर्णयासाठी पाठपुरावा अपेक्षित असणारे लोकप्रतिनिधी मात्र थंडगार असल्याचेच दिसून येत आहे.
तस्करी झालेल्या परदेशी बेदाण्याचा भांडाफोड द्राक्ष बागायतदार संघाने केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी याविषयी आवाज उठवणे अपेक्षित होते. बाजार समित्यांकडून 'नियमन मुक्ती'चा दाखला देत जबाबदारी झटकली जात आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा बाजार समितीत होणाऱ्या सौद्यांवर विश्वास आहे.
त्यामुळे शेकडो मैलांवरूनदेखील बेदाणा उत्पादक बाजार समितीत येतो. त्यामुळेच बेदाणा नियमन मुक्त झाला तरीदेखील आजही, अपवाद वगळता, बाजार समितीतच बेदाण्याची खरेदी-विक्री होत आहे.
त्यामुळे यानिमित्ताने बाजार समितीला व्यापाऱ्यावर अंकुश ठेवणे अशक्य नाही; मात्र बाजार समितीची भूमिका केवळ व्यापारधार्जिणीच राहिली आहे. या विरोधात व्यापक लढा, तसेच लोकप्रतिनिधी व बाजार समितीची सकारात्मक भूमिका निर्माण झाली, तरच बदल झाल्याचे दिसून येईल. अन्यथा 'येरे माझ्या मागल्या' अशीच अवस्था कायम राहणार आहे. (समाप्त)
उत्पादनात घट होणार
• यंदा द्राक्ष निर्मिती कमी झाल्यामुळे उत्पादन घटणार आहे. द्राक्षाला चांगला दर असल्यामुळे बेदाण्याच्या उत्पादनातही मोठी घट होणार आहे.
• त्यामुळे बेदाणा उत्पादकांना लुबाडण्यासाठी यंदाच्या हंगामातही बेदाण्याच्या उधळणीपासून ते अंडर बिलिंगपर्यंत अनेक कारणामे होत राहतील.
• या उद्योगात मूठभर व्यापाऱ्यांची मक्तेदारी तयार झाली आहे याबाबत "लोकमत"च्या माध्यमातून आवाज उठवला आहे. मात्र शेतकऱ्यांनी सजग राहणे आवश्यक आहे.
हेही वाचा : राज्यातील बेदाणा इंडस्ट्री धोक्यात; बेदाणा व्यापाऱ्यांची हाव अन् खराब झालं सांगलीचं नाव
