सोलापूर : काढणी पश्चात नुकसान व उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनी राज्य शासनाकडे बोट दाखवीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७३ हजार ७१८ शेतकऱ्यांचे सुमारे ८२ कोटी रुपये अडकले आहेत.
पुढील खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपला असताना मागील वर्षीचे पीक पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांना कृषी खाते व विमा कंपनीकडे चौकशीसाठी कष्ट करावे लागत आहे.
मागील २०२४ खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ३८ हजार १८३ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा एक रुपयात विमा भरला होता.
मागील वर्षी जुलै महिन्यात पीक विम्यात सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना दहाव्या महिन्यात आम्हाला पीक विमा नुकसान भरपाई कधी मिळणार?, अशी विचारणा करीत इंटीमेशननंतर सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या व्यक्तीपासून विविध कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे फिरावे लागत आहे.
मात्र, पैसे जमा होतील असा विश्वास कोणीही देत नाहीत. मागच्या यादीत नाव असेल असे ठोबळपणे सांगून वेळ मारली जात आहे. पीक विमा कंपनीने दोन दिवसांखाली काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत असे शेतकरी आमच्या खात्यावर पैसे कसे आले नाहीत?, असे विचारत आहेत.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून काढणी पश्चाच नुकसान भरपाई व उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाईसाठी शासनाकडून पैसे (हप्ता) आले नसल्याचे सांगण्यात आहे.
यासाठी पात्र शेतकरी ७३ हजार ७१८ इतके असून ८१ कोटी ९० लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी पैसे वाटपाचा फॉर्म्युला
◼️ खरीप २०२४ या हंगामातील उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाई २२ हजार ४९८ शेतकऱ्यांना एक कोटी ७० लाख रुपये मंजूर आहे तर पीक काढणी पश्चाच नुकसान भरपाई ५१ हजार २२६ शेतकऱ्यांना ८० कोटी २० लाख रुपये मंजूर आहेत.
◼️ विमा कंपनीला शेतकऱ्यांना पैसे वाटपासाठी ८०-२० चा फॉर्म्युला ठरलेला आहे. म्हणजे विमा कंपनीला शासनाकडून १०० रुपये दिले तर कंपनीने २० रुपये स्वतःसाठी ठेवून घ्यायचे व ८० रुपये शेतकऱ्यांना वाटप करणे आवश्यक आहे.
◼️ विमा कंपनी शासनाकडून 3 पैसे मागवून शेतकऱ्यांना वाटप करीत आहे. काढणी पश्चाच व उत्पन्नावर आधारितची ८२ कोटी रक्कम राज्य शासनाकडून मिळाली की ७४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे सांगण्यात आले.
◼️ खरीप २०२४ हंगामासाठी जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी रुपये पीक विमा कंपनीने मंजूर केले आहेत.
◼️ त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व व्यापक स्थानिय आपत्तीचे एक लाख ६३ हजार शेतकऱ्यांना १५३ कोटी ४० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील दोन दिवसांत जमा करण्यात आले आहेत.
शासनाचा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर नुकसान भरपाई जमा होईल. तसे विमा कंपनीकडून आम्हाला लेखी पत्र दिले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आमचे पैसे कधी जमा होणार, अशी वारंवार विचारणा होत आहे. आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा करीत आहोत. शेतकऱ्यांना अधिकाधिक रक्कम मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. - शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
खरीप हंगामातील पीकविम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र जमा न झालेल्या शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नुकसानभरपाई वेळेत दिल्यानंतर पुढील खरिपाची तयारी करता येणार आहे. काही शेतकरी अद्यापही भरपाईकडे डोळे लावून बसले आहेत, त्यामुळे तात्काळ भरपाई मिळावी. - अमोल पाटील, शेतकरी
अधिक वाचा: मान्सून निकोबार बेटांवर आला; महाराष्ट्रात केव्हापर्यंत येणार? जाणून घ्या सविस्तर