धान्याच्या साठवणुकीसाठी शेतकरी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. कोणी कणगीत धान्य ठेवतो, तर कोणी पोतीच्या पोती भरून थप्प्या लावतो.
हल्ली पत्र्याचे मोठमोठे डबेही बाजारात आलेत. पण, या साऱ्यापेक्षा कल्पक योजना म्हणजे पेवात साठा करणे. हळदीचा साठा पेवात करण्याची नामी शक्कल हरिपूर (ता. मिरज) येथे लढवली जायची.
आजमितीला तेथील पेव इतिहासजमा होत आले असले, तरी नव्या पिढीसाठी औत्सुक्याचे आणि अभ्यासाचे विषय ठरले आहेत.
पेव म्हणजे जमिनीत खोलवर केलेली जणू उभी गुहाच. हरिपूर परिसरात ती खूपच मोठ्या संख्येने होती. सांगलीतील हळदीची बाजारपेठ देशभरात प्रसिद्ध आहे.
तेथे विक्रीसाठी नेली जाणारी किंवा आलेली हळद हरिपूरच्या पेवांत साठवली जायची. पोतीच्या पोती हळद त्यामध्ये ओतली जायची. गरज असेल तेव्हा कामगार आत उतरून बाहेर काढायचे.
पेवामध्ये ऑक्सिजन नसल्याने कीटकांचा उपद्रव होत नाही. त्यामुळे हळद सुरक्षित, न किडता टिकून राहायची. पेव उघडल्यावर मात्र खूपच काळजी घ्यावी लागते. पेवामध्ये ऑक्सिजन नसतो, कार्बनडॉय ऑक्साइड तयार झालेला असतो.
पेव उघडल्या उघडल्या आत उतरल्यास प्राणवायूअभावी मृत्यूचा धोका असतो. त्यामुळे ती उघडल्यानंतर २४ ते ३० तासांनी आत उतरावे लागते. पेवात हळद ठेवल्याने तिचा दर्जा सुधारतो. पिवळाधम्मकपणा येतो. पेवातील उष्णतेमुळे ती फुगून काही प्रमाणात वजनही वाढते.
हळद ठेवण्यासाठी पेव व्यापाऱ्यांना भाड्याने दिली जायची. पोत्यानुसार भाडेआकारणी व्हायची. या पाडव्यापासून पुढील पाडव्यापर्यंत वर्षनिहाय भाडे आकारणी व्हायची.
पेव म्हणजे कधीकाळी हरिपूरच्या अर्थकारणाचा कणा होते. २००५, २००६ मधील महापुरात सर्रास पेव नष्ट झाले. आता त्याच्या काही खाणाखुणाच उरल्या आहेत.
अधिक वाचा: Hirvalichi Khate : हिरवळीचे खते जमिनीत नेमकी कधी आणि कशी गाडली पाहिजेत? वाचा सविस्तर