आपण सातबाऱ्यावर इकरारची नोंद करायची हे बरेच वेळा ऐकले असेल. बऱ्यापैकी सोसायटीमध्ये कर्ज काढण्याच्या वेळी इकरार नोंद करावा लागतो.
इकरार म्हणजे काय?
'इकरार' या शब्दाचा अर्थ 'संमती देणे असा होतो. एखाद्या सहकारी संस्थेचा सभासद असलेला कोणीही खातेदार, स्वतःच्या जमिनीवर एखाद्या सहकारी विकास संस्थेककडून किंवा सहकारी बँकेकडून, शेतीच्या विकासासाठी कर्ज घेतो तेव्हा महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० मधील नमुना 'ल' मध्ये त्याची संमती घेऊन, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० मधील नियम ४८ (५) अन्वये, अशा व्यवहाराची नोंद गाव नमुना ७-१२ च्या इतर हक्कात नोंदविण्यात येते.
पिक कर्जासाठी इकरार
जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकांकडून शेतकऱ्यांना वितरीत होणारे पीक कर्ज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत खातेदाराकडून करून घेतलेल्या कराराप्रमाणे मंजूर केले जाते त्यास इकरार असे म्हणतात.
सातबाऱ्यावर नोंद
इकरारची नोंद गाव नमुना न.७/१२ च्या इतर हक्कात घ्यावी लागते. त्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीतील सचिव यांनी असा इकरार संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांकडे ई-हक्क प्रणालीतून दाखल करण्यासाठी online नोंदणी करून इकराराच्या छायाप्रतीसह असे अर्ज दाखल करावेत.
ऑनलाईन अर्जासाठी खालील माहिती जवळ असणे आवश्यक
१) ज्या जमिनीवर नाव लावायचे ते स्थान (जिल्हा,तालुका,गाव,गट नंबर/सर्वे नं)
२) अर्जदाराचे संपूर्ण नाव.
३) अर्जदाराचा मोबाईल नंबर.
४) अर्जदाराचा इ-मेल आय डी (असल्यास)
५) सोसायटी चढविण्यासाठी सोसायटीचे पत्र.
खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
१) अर्जदाराचे ओळखपत्र.
२) सोसायटी इकरारची प्रत.
अधिक माहितीसाठी
अधिकच्या माहितीसाठी तुम्ही ग्राम महसूल अधिकारी/तलाठी तसेच आपल्या गावचे सचिव, विकास सेवा सोसायटी यांचेशी संपर्क साधावा. ह्या नोंदणीसाठी शासनाने ई-हक्क ऑनलाईन नोंदणी प्रणाली सुरु केली आहे.
अधिक वाचा: कृषी यांत्रिकीकरण योजनेतील १ लाख अनुदानाची मर्यादा काढली; आता असे मिळणार अनुदान