Join us
Daily Top 2Weekly Top 5

Water Management : लोकसहभागातून बांधली ७३ शेततळे; शेतीला मिळतंय वर्षभर पाणी! आधी नव्हतं एकही शेततळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:52 IST

रेनट्री फाउंडेशन या संस्थेने गेल्या चार वर्षांत येथील नऊ गावांत लोकसहभागातून आणि श्रमदानातून तब्बल ७३ शेततळी तयार करून दिली आहेत. यामुळे ६३,१५६ घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे. 

Pune : पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात दरवर्षी भरपूर पाऊस होतो. त्यातच वेल्हे तालुका हा सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्यांपैकी एक. पण तरीही डिसेंबर ते मे या महिन्यांत शेतीसाठी पाणीटंचाई भासते. मात्र गेल्या चार वर्षांपासून परिस्थिती हळूहळू बदलत आहे. रेनट्री फाउंडेशन या संस्थेने गेल्या चार वर्षांत येथील नऊ गावांत लोकसहभागातून आणि श्रमदानातून तब्बल ७३ शेततळी तयार करून दिली आहेत. यामुळे ६३,१५६ घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे. 

राजगड (वेल्हे) हा महाराष्ट्रातील मोजक्या तालुक्यापैकी आहे, ज्या तालुक्यातील नऊ गावांत तब्बल ७३ शेततळी निर्माण करून शाश्वत पाणी व्यवस्थापनाचे काम झाले आहे. लव्ही, आवळी, मेरावणे, साखर, दादवडी, फणशी, चिरमोडी, घावर आणि गुंजवणे या नऊ गावांतील स्थानिकांनी शेततळी खोदकामात सक्रिय सहभाग घेतला, तर शेततळ्यासाठी लागणारे कापड रेनट्री फाऊंडेशनने अनुदान स्वरूपात दिले. याआधी या गावांत एकही शेततळे नव्हते. 

पावसाचे पाणी या शेततळ्यांत जमा होऊन शेतीला वेळेवर पाणी मिळू लागले. त्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होत आहे. डिसेंबर ते मे कोरड्या दिवसांमध्येही या शेततळ्यांमुळे शेतीला पाणी उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्याच्या संधी वाढल्या असून त्यामुळे शेती अधिक फायदेशीर बनली आहे. या शेततळ्यांचा उपयोग केवळ शेतीसाठीच नाही, तर बागायती पिकांसाठी, उन्हाळ्यात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी, तसेच जनावरांच्या चारा पिकवण्यासाठी होणाऱ्या शेतीसाठीही होत आहे. पावसाचे पाणी साठवून त्याचा संरक्षक सिंचन (protective irrigation) पद्धतीने वापर केल्यामुळे कोरड्या दिवसांमध्येही पिकांना जीवनदायिनी ठरणारं पाणी मिळतं. त्यामुळे शेती अधिक फायदेशीर बनली असून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू लागले आहे. रेनट्री फाउंडेशनचा हा उपक्रम गाव पातळीवर जलसंधारणाच्या माध्यमातून समतोल विकास साधणारा ठरला आहे. वातावरणातील बदलांमुळे तापमानात होणारी वाढ, वीज भारनियमनाचे संकट यातून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना डिसेंबर ते मे दरम्यान पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असे. 

माझे २८ गुंठे क्षेत्र आहे. मी पारंपरिक पद्धतीने पिके घेतो. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो, तरीही उन्हाळ्यात शेतीला पुरेसे पाणी मिळत नव्हते, मी रेनट्री आणि विनती ऑरगॅनिक यांच्या माध्यमातून शेततळे बांधले. त्यामुळे पाण्याची सोय होऊन शेतीतून जास्त फायदा मिळू लागला. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने शेततळे बांधण्याचा विचार जरूर करावा. - राहुल बांदल, गुंजवणे  

English
हिंदी सारांश
Web Title : Community-Built Ponds Solve Water Woes, Boosting Farming All Year

Web Summary : Ninety-three farm ponds in Pune's Velhe region, built through community efforts, are revolutionizing agriculture. These ponds, created with the help of the Raintree Foundation, provide year-round irrigation, increasing yields and farmer incomes in nine villages previously facing water scarcity.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणेपाणीदुष्काळ