नाशिक : गेल्यावर्षीपेक्षा जास्त पर्जन्यमान होऊनही गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात यंदा घट झाली आहे. असे असतानाही फेब्रुवारीच्या सुरुवातीला एकही टँकर सुरू झालेला नसल्याने दिलासादायक चित्र आहे. मागील वर्षी भरपावसात टँकर सुरू होते. यंदा त्यातून दिलासा मिळाला असला तरी मागील वर्षीच्या तुलनेत धरणातील घटलेला पाणीसाठा पाहता भविष्यात टँकर वाढण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ७ कोटी ३८ लाख २५ हजार रुपयांचा सविस्तर कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील १ हजार ८४ गावे व वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता असून, त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी १६२ टँकर प्रस्तावित करण्यात आले आहेत.
जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या कालावधीत तापमानातीलाढ होऊन पाणीसाठ्यावर ताण येण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने आधीच खबरदारीचे पाऊल उचलले आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा, खासगी विहिरींचे अधिग्रहण, तसेच प्रगतिपथावरील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील टंचाईच्या अनुषंगाने जिल्ह्यात एकूण १६२ टँकरसाठी ६ कोटी ३६ लाख ४८ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
याशिवाय, टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी उपलब्धतेसाठी खासगी विहिरी अधिग्रहणासाठी १ कोटी १ लाख ७७हजार रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १४ प्रगतिपथावरील नळयोजना लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. धरणातील पाणीसाठा घटल्याने भविष्यात टँकर सुरू करण्याची मागणी होऊ शकते.
टंचाई कृती आराखडा : २०२६/२०२५
निधीची तरतूद : ७. ३८ कोटी / ८.८६ कोटी
संभाव्य टंचाईग्रस्त
गावे-वाडे : १,०८४/१०५१
पाणीपुरवठ्यासाठी टँकर : १६२/१४७
गंगापूर धरणसाठा : ७०.०९/८२.७०
