Pune : राज्यातील ऊस शेतकरी आणि साखर कारखान्यांसाठी काम करणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. यामध्ये देशात दरवर्षीच्या तुलनेत ऊसाचे गाळप चांगले झाले आहे. पण मागील सात वर्षांपासून साखरेच्या एमएसपीमध्ये केंद्र सरकारने वाढ केली नसल्यामुळे साखर कारखाने अडचणीत आहेत अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, बी. बी. ठोंबरे, व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, विवेक कोल्हे, श्रीराम शेटे उपस्थित होते.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी बोलताना सांगितले की, "यंदाचा देशातील ऊस गाळप हंगाम दरवर्षीपेक्षा चांगला चालला असून आत्तापर्यंत देशात ४९५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. त्यातील १९५ साखर कारखाने हे महाराष्ट्रातील असून देशातील सर्व कारखान्यांनी मिळून आत्तापर्यंत ११५ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा २० लाख मेट्रीक टनाचे गाळप अधिक झाले आहे."
यासोबतच ऊसासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात कारखाने आणि शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी एआयच्या वापरासंदर्भात व्हीएसआय प्रयत्न करणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना छोटे हार्वेस्टर देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. यासाठी मी एनसीडीसी सोबत चर्चा करत असून २०२६-२७ च्या गाळप हंगामात किमान १० हजार छोटे हार्वेस्टर शेतकऱ्यांना देण्यात येतील अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
