Pune : वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने ऊस कारखानदारीमध्ये काम करणाऱ्या उत्कृष्ट कारखाने, शेतकरी यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा केली आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट साखर कारखाना आणि विभागवार सर्वोत्कृष्ट शेतकरी असे पुरस्कार देण्यात येतात. यासोबतच साखर कारखान्यांमध्ये विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही पुरस्कारांची घोषणा केली आहे.
सर्वच विभागात उत्तम कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार यंदा पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर (पुणे) येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे.
सोमेश्वर साखर कारखान्याची वैशिष्ट्ये
- साखर कारखान्याची गाळप क्षमता ७५०० टन प्रति दिन असून ३६ मेगा वॅट क्षमतेचा सहवीजनिर्मिती व ३० किलो लिटर प्रतिदिन इथेनॉल निर्मिती प्रकल्प आहे.
- हंगाम २०२४-२५ मध्ये १२ लाख २४ हजार ५२४ टन ऊसाचे गाळप केले असून त्यामधुन १४ लाख ५६ हजार २०५ क्विंटल साखर उत्पादन केलेले आहे.
- साखर कारखान्याचा साखरेचा उतारा ११.८९% इतका राहिलेला आहे.
- सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून ५ कोटी ८८ लाख ४५ हजार ७९८ युनिटची महावितरणला विक्री केलेली आहे.
- गाळप क्षमतेचा वापर १११.०३%, विजेचा वापर २९.९४ किलो वॅट प्रति टन ऊसावरती राहिलेला आहे, व बगॅसची बचत ७.२१% इतकी झालेली आहे.
- गाळपाचे बंद काळाचे प्रमाण (मेकॅनिकल अॅन्ड इलेक्ट्रिकल) -०.०६% इतके असुन मागील वर्षीच्या तुलनेत गाळप क्षमतेत वाढ ५.०३% इतकी झालेली आहे.
- ऊस उत्पादन वाढीसाठी विशेष मार्गदर्शन
- अॅपद्वारे मोजणी आणि नोंदणी कार्यक्रम
- कार्यक्षेत्रात खोडवा व्यवस्थापनावर जास्त भर
- हुमणी कीड नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न
- कृत्रिम बुध्दिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब
- दैनंदिन आसवनी उत्पादन क्षमता ३० हजार लिटर प्रतिदिन
- आसवनी सरासरी क्षमता वापर ११६.४%
- फर्मेन्टेड वॉशमधील अल्कोहोलचे प्रमाण १२%
- किण्वन प्रक्रियेची कार्यक्षमता ९०.४%
- एकुण इथेनॉलचे उत्पादन ३१.७८ लाख लिटर
इतर साखर कारखान्यांना मिळालेले पुरस्कार
१) कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार ( रोख एक लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र) - श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, द्त्तनगर, कोल्हापूर
२) कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार ( रोख एक लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र) - नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रिज, साईनगर- धाराशिव,
३) कै. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार (रोख एक लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र) - अंजिक्यतारा सहकारी साखर कारखाना, शाहूनगर- शेंद्र, सातारा
४) कै. रावसाहेब पवार सर्वोत्कृष्ट आसवणी पुरस्कार ( रोख एक लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) - राजारामबापु पाटील सहकारी साखर कारखाना, राजारामनगर, सांगली
५) कै. राजे विक्रमसिंह घाटगे सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार - विभागून ( रोख एक लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र) -- विलास सहकारी साखर कारखाना, तोंडार, लातूर, वेकटेशकृपा शुगर मिल्स लि. जातेगाव, पुणे
६) कै. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार - विभागून ( रोख एक लाख रूपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र) -- डॉ़. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, वांगी, सांगली, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, शिवनगर, सातारा.
