Pune : राज्यातील ऊस पिकावर संशोधन करणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटने काल (ता. २३) उसाचे चांगले उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि चांगली कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. यामध्ये धाराशिव, लातूर व बीड जिल्हयातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या नॅचरल शुगरला या वर्षी सर्वोत्कृष्ट डिस्टीलरी, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता प्रथम आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन प्रथम असे एकूण ३ पुरस्कार मिळाले आहेत.
सदर पुरस्कारांचे वितरण व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मागील आर्थिक वर्षामध्ये नॅचरल शुगरने आसवनी विभागामध्ये मोलाचे कार्य करताना दैनिक उत्पादन क्षमता, सरासरी क्षमता वापर, फर्मन्टेड वॉश मधील अल्कोहोलचे प्रमाण, किन्वन प्रक्रियेची कार्यक्षमता, मागील ३ वर्षात बी-हेवी मोलासेस व सिरप पासून ईथेनॉल निर्मिती यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याने या वर्षीचा कै.रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार, १ लाख रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नॅचरल शुगरचे तांत्रिक विभागामध्ये हंगाम २०२३-२४ ऊस गाळपातील पॅरामिटर्स उत्कृष्ट ठेवून मागील हंगामामध्ये चांगले गाळप करून बगॅस बचत आणि साखरेचे उत्पादन चांगले घेतल्याने व्हीएसआय मार्फत उत्तर पूर्व विभागाचा तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नॅचरल शुगरचे वित्त विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट कार्य करून सरासरी साखरेचा उत्पादन खर्च राज्यामध्ये सर्वात कमी राखल्याने, एकूण सर्वच प्रक्रिया खर्च इतरांपेक्षा कमीत कमी ठेवल्याने, खेळत्या भांडवलावरील व्याज प्रतिक्विंटल दर सर्वात कमी ठेवल्याने आणि कारखान्याचे नक्त मुल्य निर्देशांक सर्वोत्कृष्ट ठेवल्याने, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देण्यात आला.
सदर पुरस्कारा बद्दल बोलताना नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न बी.बी.ठोंबरे म्हणाले की, "या सर्व पुरस्काराचे खरे मानकरी नॅचरल परिवाराचे सर्व घटक असून प्रामुख्याने ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद, तोड वाहतुक ठेकेदार व मजूर आणि मुख्यत्वे कारखान्याचे प्रवर्तक, संचालक सर्व अधिकारी व कर्मचारी हे आहेत. त्यामुळे हे सर्व पुरस्कार आमचे सभासद व कर्मचाऱ्यांना समर्पित करतो."