नंदलाल पवार
मंगरूळपीर तालुक्यातील चांभई येथील प्रगतशील शेतकरी प्रीतम भगत यांनी जलपुनर्भरणाचा (water recharge) प्रभावी वापर करून सिंचनासाठी उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढला आहे.
त्यांनी शेतातील विहिरीत (Well) पावसाचे पाणी (Rainwater) संकलित करण्यासाठी १५ होल केले असून, या होलमुळे परिसरातील दोनशे मीटर चौरस मीटर अंतरात पडणारे पावसाची पाणी विहिरीत संकलित होत राहते त्या पाण्यावरच विविध पिके घेता येतात.
दिवसेंदिवस खालावत चाललेल्या पाणी पातळीमुळे शेतकऱ्यांना सिंचनाची (Irrigation) समस्या भेडसावत आहे. तीनशे फूट खोल खोदून ही कूपनलिकांना पाणी लागत नाही आणि लागले तर लवकरच कोरड्या पडतात. परिणामी, शेतकऱ्यांना सिंचन करणे शक्य होत नाही.
अनेकदा पाण्याअभावी शेतामधील हिरवेगार पीक डोळ्यांदेखत करपते आणि शेतकऱ्यांचे श्रम व लाखोंच्या पैशाची हानी होती. जिल्ह्यातील बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या असताना प्रितम भगत यांच्या विहिरीला अद्यापही आठ ते दहा फुट पाणी आहे.
मंगरूळपीर येथील प्रगतशील शेतकरी प्रीतम गोविंदराव भगत यांनी मात्र सिंचनासाठी निर्माण होणाऱ्या पाण्याच्या समस्येवर जलपुनर्भरणाचा तोडगा काढला. त्यांनी शेतामधील विहिरीत तब्बल १५ आडवे होल केले. या होलमुळे त्यांना सिंचनाची सोय झाली आहे.
विहिरीत संकलित होणाऱ्या पाण्याच्या आधारे वडिलोपार्जित सहा एकर शेतीपैकी किमान दोन एकरांत ते वर्षभर विविध पिके घेतात. विहिरीलगतच्या शोषखड्ड्यामुळे पावसाचे पाणी असे विहिरीत संकलित होते.
विहिरीलगत शोषखड्डा
भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता राज्यशासनाकडून जलतारा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पाच चौरस फुट लांब, रुंद आणि सहा फुट खोल शोषखड्डा खोदण्यात येत आहे. प्रत्यक्षात प्रीतम भगत यांनी पाच वर्षांपूर्वीच विहिरीलगत, असा शोषखड्डा खोदला आहे.
१०० ते ३०० फुट अंतर लांबीचे होल
प्रीतम भगत यांनी जलपुनर्भरणासाठी विहिरीत खोदलेल्या आडव्या होलची लांबी १०० ते ३०० फुटांपर्यंत आहे. या होलचा परिघ हा किमान दोनशे चौरस फुट अंतराचा आहे.
विहिरीत चारही बाजुंनी आडवे होल केलेले आहेत. यासाठी प्रितम भगत यांनी मोठ्या प्रमाणात खर्चही केला. या होलमुळे मात्र त्यांना मोठा फायदाही झाला. पाऊस कमी पडला तरीही त्यांच्या विहिरीला पुरेसे पाणी राहते.
शेतात सिचंनासाठी विहिर खोदली. परंतु पुरेसे पाणी लागले नाही. तेवढ्या पाण्यात सिंचन शक्य नव्हते. त्यामुळे जलपुनर्भरणाचा पर्याय स्वीकारला. यासाठी विहिरीत २० ते २५ फुट अंतरात आडवे १५ होल केले. शिवाय, विहिरीलगत शोषखड्डाही केला. त्यामुळे परिसरातील दोनशे मीटर अंतरात पडणारे पावसाचे पाणी विहिरीत संकलित होण्यास आधार झाला. - प्रीतम भगत, शेतकरी, चांभई (मंगरुळपीर)