Pune : राहुरी कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी पदभार स्विकारल्यानंतर संशोधन केंद्रे आणि महाविद्यालयाला भेटी देत आहेत. त्यांनी नुकताच पुणे कृषी महाविद्यालय, देशी गाय संसोधन व प्रशिक्षण केंद्र, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड येथे भेट दिली. विभागीय कृषी संशोधन केंद्राने तयार केलेले फुलांचे, पेरूचे व इतर वाण हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरत असून या संशोधन केंद्राचे काम कौतुकास्पद आहे असं ते म्हणाले.
दरम्यान, गणेशखिंड विभागीय कृषी संशोधन केंद्राचा १५० वर्षाच्या गौरवशाली इतिहासात विकसित करण्यात आलेले विविध पिकातील ३१ वाण, तसेच केंद्राने विविध पिक उत्पादनाबाबत दिलेल्या संशोधन शिफारसी असे भरीव योगदान विद्यापीठाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. येणाऱ्या काळात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी फायद्याचे ठरणारे संशोधन या केंद्राकडून व्हावे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पेरूंच्या वाणामध्ये प्रसिद्ध असलेला सरदार (लखनौ ४९) हा वाण याच संसोधन केंद्राने तयार केला असून या वाणाचा काही महिन्यांनी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. सरदार हा पेरुचा वाण आजही शेतकरी वर्गाकडून सर्वाधिक मागणी असलेला वाण आहे. तसेच गुलाबी रंगाचा फूले अमृत हा वाण नव्याने विकसीत केला. या ठिकाणी गुलछडी, गनाडीओलस, पपई व भाजीपाला पिकातील नवीन वाण विकसित करण्याबाबत संशोधन सुरू आहे.
विभागीय कृषि संशोधन केंद्रास बळकटी देण्यासाठी एनएचएम मार्फत उभारण्यात येत असलेल्या मॉडल नर्सरी आणि आयसीआयसीआय फाऊंडेशन च्या सीएसआर फंडातून शेती कामासाठी आवश्यक असणारे ट्रक्टर व अवजारे तसेच उभारणी सुरु असलेल्या गांडूळ खत प्रकल्प, रेशीम प्रकल्प, चेन लिक कुंपण, हरितगृह व शेडनेट उभारणी प्रकल्पांना भेट देऊन चालू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुभाष भालेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
