हिंगोली जिल्ह्याच्या वसमत विभागातील दोन सहकारी आणि एका खासगी साखर कारखान्याने महिनाभरात एकूण २ लाख ७८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.
तिन्ही कारखाने गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असले तरी टोकाई सहकारी साखर कारखान्यात नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असल्याने त्याचे गाळप इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी झाले आहे.
पूर्णा सहकारी साखर कारखान्याने १ लाख २५ हजार मेट्रिक टन गाळप ३२ दिवसांत पूर्ण केले आहे. कारखान्याचे ऊस गाळप उद्दिष्ट ६ लाख मेट्रिक टन आहे. तर कोपेश्वर साखर कारखान्याने २९ दिवसांत १ लाख १५ हजार मेट्रिक टन गाळप केले आहे. टोकाई सहकारी साखर कारखान्याने १९ दिवसांत ३८ हजार मेट्रिक टन गाळप केले आहे.
तीन कारखान्यांनी महिनाभरात एकूण गाळप २ लाख ७८ हजार मेट्रिक टन केले आहे. पूर्णा आणि कोपेश्वर कारखान्यांनी गाळप उद्दिष्टपूर्तीसाठी सुयोग्य नियोजन केले आहे; पण 'टोकाई'च्या बाबतीत नेमके उलट चित्र आहे.
'टोकाई'त नियोजनाचा अभाव, शेतकऱ्यांत संभ्रम
टोकाई सहकारी साखर कारखान्यात प्रशासनाने गाळपासाठी कोणतेही ठोस नियोजन आखले नसल्याने गाळप प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. कळस म्हणजे, कारखान्याचे उपाध्यक्ष यांचाच ऊस गाळपासाठी टोकाई कारखान्याकडे न जाता दुसऱ्या कारखान्याकडे गेला आहे. या प्रकारामुळे सभासद आणि शेतकरी टोकाई कारखान्यास ऊस द्यावा की नाही, या मनःस्थितीत अडकले आहेत.
उद्दिष्ट पूर्ण करणार; पूर्णा कारखान्याचा दावा
पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी कारखाना ६ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, उद्दिष्टपूर्तीसाठी कारखाना प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे आणि सर्व ऊसउत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेला जाणार आहे. त्यांनी कारखाना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा : उत्तम आरोग्यासाठी साखर खाणं हानिकारकच, पण गूळ किती चांगला? जाणून घ्या सविस्तर
