अशोक डोंबाळे
सांगली : वर्षाला खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी एक लाख ते ९० हजार टन अनुदानित युरिया जिल्ह्यात येतो. या युरियापैकी काही मुख्य विक्रेते, कृषी सेवा केंद्र चालकांच्या माध्यमातून ३६ हजार टन युरिया गैरमार्गाने उद्योगांसाठी जातो.
शासकीय दरानुसार त्याची किंमत २५ कोटींवर जाते. गैरप्रकाराने युरिया संकलित करून तो मुंबई, पुणे, ठाण्यातील उद्योगनगरीत पाठवणारे रॅकेट सक्रिय आहे. ते मोडीत काढण्यात कृषी विभागाला अपयश आले आहे.
जिल्ह्यासाठी वर्षाला एक लाख ते ९० हजार टनापर्यंत अनुदानित युरिया येत आहे. शेतकऱ्यांना कमी दरात युरिया मिळावा, म्हणून शासनाचे प्रयत्न आहेत; पण हा अनुदानित युरिया शेतकऱ्यांकडे कमी आणि उद्योजकांच्या घशातच जास्त जात आहे.
अनुदानित युरिया उद्योगनगरीच्या घशात घालणारे रॅकेट कार्यरत आहे. याला राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाडस होत नाही. म्हणूनच, सहीसलामत वर्षाला २० ते २५ कोटी रुपयांचा युरिया जिल्ह्यातून उद्योगासाठी मुंबई, पुणे, ठाणे येथे जात आहे.
यातून युरिया तस्करांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवली असून, ते राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. सांगलीत काही उद्योजकांना अनुदानित युरियाचा पुरवठा होत असल्याचे सूत्राने सांगितले.
युरियाचा गैरवापर करणारी केंद्रे
कडेगाव, सांगली, कुपवाड औद्योगिक वसाहत, तासगाव, इस्लामपूर येथे काळ्या बाजाराचा युरिया संकलित करणारे रॅकेट कार्यरत आहे. सांगली जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांसह काही मुख्य विक्रेत्यांचाही युरियाच्या काळ्या बाजारात हात गुंतला आहे; पण राजकीय हस्तक्षेपामुळे कृषी विभागाचे अधिकारी कोणतीच कारवाई करू शकत नसल्याची चर्चा आहे.
रात्रीस खेळ चाले
अनुदानित युरिया दिवसभर संकलित करून एका गोदामात एकत्रित केला जात आहे. त्यानंतर अनुदानित युरियाचे बॅग काढून औद्योगिक वापरासाठीचा युरिया असा शिका असलेल्या बॅगमध्ये भरले जात आहे. काळाबाजार करणारे रॅकेट कुपवाड औद्योगिक वसाहत, तासगाव, कडेगाव, वाळवा तालुक्यांत कार्यरत आहे.
असे चालविले जाते खत विक्रीचे रॅकेट
- शेतकऱ्यांना खत विक्रीची पक्की बिले दिली जात नाहीत.
- खते विकताना बिलावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात नाहीत.
- शेतकऱ्यांना विकलेले खत व खत दुकानामधील विक्री पावती पुस्तक यात तफावत.
- शेतकऱ्यांना खत विकल्याचे दाखवून प्रत्यक्षात काळ्याबाजारात विक्री.
प्लायवूड, पेंट इंडस्ट्रीसाठी वापर
- शेतकऱ्यांसाठी येणारा युरिया हा अनुदानित असतो.
- शेतकऱ्यांना ही बॅग २६६ रुपयांना मिळते. याची मूळ किंमत २२५७ रुपये आहे, तर उद्योगाच्या वापरासाठी येणारा युरिया हा वेगळ्या पॅकिंगमध्ये येतो, त्यावर कोणतेही अनुदान नसते.
- या युरियाची किंमत ३५०० ते ४५०० रुपयांपर्यंत आहे.
- किमतीत असलेल्या मोठ्या फरकामुळे याचा काळाबाजार करून शेतकऱ्यांसाठी येणारा युरिया उद्योगासाठी पुरवण्याचा हा गोरखधंदा जिल्ह्यात सुरू आहे.
- हा युरिया प्लायवुड गम व पेंट इंडस्ट्रीसाठी मुंबई, ठाणे येथे पाठवला जात आहे.
अधिक वाचा: विवाहित मुलीला वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळतो का? काय आहे नियम? वाचा सविस्तर