Join us

सोनेसांगवीत अवकाळी पावसाचा कहर; चार एकरांतील टरबूजवाडी सडल्याने दहा लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:31 IST

Watermelon Farming : ऐन तोडणी करून टरबूज विक्रीच्या वेळीच १५ ते २० दिवस अवकाळी पावसाने हाड लावल्यामुळे बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सोनेसांगती येथील राजाभाऊ भाऊसाहेब कणसे या शेतकऱ्याच्या टरबूजवाडीतील सर्व टरबूज जागेवर सडली. यामुळे त्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मधुकर सिरसट 

ऐन तोडणी करून टरबूज विक्रीच्या वेळीच १५ ते २० दिवस अवकाळी पावसाने हाड लावल्यामुळे बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सोनेसांगती येथील राजाभाऊ भाऊसाहेब कणसे या शेतकऱ्याच्या टरबूजवाडीतील सर्व टरबूज जागेवर सडली. यामुळे त्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोनेसांगती येथील राजाभाऊ भाऊसाहेब कणसे यांनी पावणेचार एकर जमिनीवर मार्चमध्ये ५० हजार रुपये खर्च करून टरबुजाच्या २१ हजार रोपांची लागवड केली. ६० हजार रुपये खर्च करून वेळोवेळी खते दिली. एक लाख रुपयांची विविध प्रकारच्या औषधांची ५ ते ६ वेळा फवारणी केली. जीच लावून मशागत केल्याने वेलीला एक ते पाच किलो वजनाचे टरबूज पोसले होते.

मे महिन्यात पहिली तोडणी करून टरबूज विक्री करण्याच्या वेळीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. दररोज ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाची टरबूज आपोआपच वेलीपासून तुटून अलग होऊन जागेवरच सडले.

त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात काहीच उत्पन्न पडले नसून रोपे, खते, औषधासह लागवड व फवारणीची मजुरी असा जवळपास अडीच लाख रुपयांचा खर्च पाण्यात व्यर्थ गेला आहे. तोंडचा घास निसर्गाने हिरावल्यामुळे शेतकरी राजाभाऊ कणसे यांचे दहा लाखांचे नुकसान झाले. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

नुकसानीचा पंचनामा

• या नुकसानीची माहिती मिळताब तालुका कृषी अधिकारी सागर पटाने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक योगेश लामतुरे, ग्राम महसूल अधिकारी बालाजी इंगळे यांनी राजाभाऊ कणसे यांच्या शेतात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला.

• यात त्यांच्या टरबूज पिकाचे १०० टक्के नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात केल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी बालाजी इंगळे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली आहे.

मुलाला कृषी दुकान टाकण्याचे स्वप्न भंगले?

• २.५ लाख रुपये खर्च उत्पन्न मिळेल म्हणून पावणेवार एकर जमिनीवर टरबुजाचे पीक घेतले होते.

• टरबूजच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशावर मुलाला कृषी दुकान टाकून द्यायचे होते. आता कसे दुकान टाकून द्यायचे? अशी व्यथा शेतकरी राजाभाऊ कणसे यांनी 'लोकमत'शी बोलताना मांडली.

हेही वाचा : शेतीला मिळणार तंत्रज्ञानाची साथ; पीक व्यवस्थापनापासून ते बाजारापर्यंत सर्व माहिती आता एका क्लिकवर

टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसफळेशेतीशेतकरीबीडपीकसरकारमराठवाडाबाजार