शेतकरी पुंडलिक केवटे यांनी अंकुर कंपनीचे तुरीचे वाण लावले होते. मात्र, पिकाला फुलधारणा न झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला असून, त्यांच्यावर आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे.
शेतकरी पुंडलिक केवटे यांची शेती दाभा गावाच्या हद्दीत शेत सर्व्हे क्र. १६७ आराजी १.८० हे.आर. ही असून, त्यांनी ८ जून रोजी चौधरी कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी केले होते. तूर बियाणाचे वाण ४ महिन्यांत येत असून, त्यावर गहूदेखील पेरू शकतो, या आशेने त्यांनी वाण लावले होते.
१० जून रोजी लावणी करूनही आजघडीला तुरीच्या झाडाला फुलधारणा झाली नाही. याबाबत कंपनीच्या प्रतिनिधीला कळविले असता, त्यांनी फवारणीचा उपाय सांगितला. फवारणी करूनही काहीच फायदा झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
३ लाख नुकसान भरपाईची मागणी
• शेतकऱ्याने नुकसानभरपाई म्हणून एकरी १० क्विंटल प्रमाणे २.५ एकरांचे २५ क्विंटलचे ३ लाख रुपये द्यावे, अशी मागणी केली आहे.
• याप्रकरणात कारंजा (घाडगे) जि. वर्धा येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीनंतर त्यांनी १७ रोजी पाहणी केली.
• मात्र, त्यावेळी सेलसुरा येथील कृषी तज्ज्ञांना बोलवण्यात आले होते. पण ते त्या दिवशी न आल्याने या गंभीर प्रकरणाचे भिजत घोंगडे कायमच आहे.
• त्यामुळे अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली.
मी स्वतः आणि माझ्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली. तसेच चौधरी कृषी केंद्राच्या संचालकांनाही शेतात बोलावण्यात आले होते. यासंदर्भात शास्त्रज्ञांना माहिती देण्यात आली आहे. परंतु, अद्याप कृषी शास्त्रज्ञ आलेले नाहीत. येत्या एक ते दोन दिवसांत ते येणार आहेत. - सुजाता कांबळे, तालुका कृषी अधिकारी, कारंजा (घाडगे) जि. वर्धा.
हेही वाचा : हिवाळ्यात बाजरी खाण्याचे फायदे आणि आरोग्यदायक परिणाम वाचून तुम्हीही होणार थक्क
