कोणतेही पीक घेतले तरी काही ना काही नैसर्गिक संकट येतेच. यंदा अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, सोयाबीनला फटका बसला. त्यातून सावरलेल्या तुरीवर पोखरणाऱ्या अळीने हल्ला केला आहे. औषधांच्या फवारणीमुळे वाचलेली तूर शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे.
ज्वारी, करडईचे पीक घ्या. काढणी व मळणीसाठी मजूर मिळत नाहीत. मशागत, पेरणीसाठी वर्षभर कष्ट व खर्च करून अपेक्षित उत्पन्न व आलेल्या धान्याला अपेक्षित भाव मिळेलच असे नाही.
खरीप हंगामात कधी पाऊस नसल्याने पिके हाती लागत नाहीत तर कधी अति पावसाने पिके पाण्यात जातात. अशातही उशिराने येणारी तूर तग धरून राहते. मात्र, नंतर किडीचा प्रादुर्भाव वाढला तर अपेक्षित उत्पादन येत नाही.
यंदा तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तशा सर्वच पिकांवर औषधांच्या फवारण्या कराव्या लागतात. मात्र, कीड व अळीने हल्ला केला तर औषधांचा अधिकच मारा करावा लागतो. यंदाही तुरीवर अळी आली आहेच.
तज्ज्ञांचा सल्ला
- शेंग पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी पीक फुलोऱ्याात असताना ५ टक्के निंबोळी अर्कची फवारणी करावी.
- अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास फ्लू-बेंडामाईड किंवा इमामेक्टिन बेंजोएट १०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणी घ्यावी.
- शेंगमाशी व पिसारी पतंग या किडीच्या नियंत्रणासाठी क्लोराट्रिनिप्रोल ८० मिली किंवा लॅम्डा सायहॅलोथ्रीन २०० मिलि प्रति २०० लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.
अधिक वाचा: Tur Kid Niyantran : तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय