सतीश पाटील
शिरोली : केंद्र शासनाने ट्रॅक्टर खरेदीसाठी दिलेले ५० टक्क्यांपेक्षा जास्त अनुदान, जीएसटी करात झालेली कपात, अण्णासाहेब पाटील अर्थसाह्य यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर विक्री सुसाट धावेल, अशी अपेक्षा ट्रॅक्टर विक्री डिलर्सना आहे.
जीएसटी कमी झाल्याने ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शोरूमना भेटी देऊन अनेकांनी ट्रॅक्टर बुकिंग केले आहेत. वर्ष २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत ट्रॅक्टर विक्रीचा आकडा काहीसा मंदावला होता.
वर्ष २०२०-२१ मध्ये ३०० पेक्षा जास्त विक्री झाली होती. यंदा मात्र शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे. पॉवर टिलर, लहान ट्रॅक्टर, ४५, ५०, ५५ एचपीचे मोठे ट्रॅक्टर यांना मागणी आहे.
कृषी विभागाच्या अनुदान योजनेत ट्रॅक्टर, ट्रेलर, औजारे खरेदीसाठी शेतकऱ्यांना २५ लाखांवर १० लाख, १० लाखांना ४ लाख आणि १० लाखांच्या आत १ लाख २५ हजार, तसेच पॉवर टिलरला ८५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे.
याशिवाय केंद्र शासनाने ट्रॅक्टरवरील जीएसटी ५ टक्क्यांवर आणल्याने यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर विक्री वाढण्याची शक्यता आहे.
ट्रॅक्टरला अनुदान
२५ लाखांना १० लाख, १० लाखांना ४ लाख, १० लाखांच्च्या आत १.२५ लाख, तर पॉवर टिलरला ८५ हजार.
खरेदी करणे का परवडणार?
◼️ ट्रॅक्टर खरेदीसाठी १ लाख २५ हजार अनुदानाची सोय.
◼️ जीएसटी दरात कपात १२ वरून फक्त ५ टक्के.
◼️ अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून अर्थसाहाय्य उपलब्ध.
ट्रॅक्टर खरेदीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा ट्रॅक्टर विक्री जोरदार होईल. शासनाच्या अनुदानामुळे, कमी झालेला जीएसटी, सुलभअर्थसाहाय्य यामुळे ट्रॅक्टर खरेदीला शेतकरीवर्गाने पसंती मिळेल. - संजय चव्हाण, विक्रेते
पॉवर टिलर आणि लहान ट्रॅक्टरला ५० टक्के अनुदान, जीएसटी सात टक्क्यांची कपात यामुळे शेतकऱ्यांना २ लाखांचा ट्रॅक्टर १ लाखाला मिळणार आहे. त्यामुळे यंदा ३०० पेक्षा जास्त लहान-मोठे ट्रॅक्टर विक्री होण्याची अपेक्षा आहे. - सागर पाडळकर ट्रॅक्टर विक्रेते
अधिक वाचा: शेती आधारित व्यवसायांसाठी महिलांना मिळतंय ५ लाखांपर्यंत विनातारण कर्ज; काय आहे योजना?