अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि बाजारातील कमी भाव याचा फटका यंदा पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ज्यामुळे पपईचा मळा अक्षरशः नुकसानीच्या गळ्यात अडकला आहे.
जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील संजय यांनी सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा खर्च करून उभा केलेल्या पिकातून आतापर्यंत केवळ ७५ हजार रुपयांचेच उत्पन्न हाती आले असून, उरलेल्या मालातून तरी जेमतेम खर्च निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्याला आहे.
टोणगाव शिवारात शेतकरी संजय बडजावत यांनी सुमारे २ एकर क्षेत्रात एकूण १,६०० पपईच्या झाडांची लागवड केली आहे. ही लागवड १४ मार्च २०२५ रोजी करण्यात आली होती. पपई पिकासाठी खते, रासायनिक औषधे, फवारण्या यावर खर्च करण्यात आला होता. पपई फळांचे संरक्षण व्हावे, यासाठी पुरेशी व्यवस्थाही करण्यात आली होती.
अतिवृष्टी अन् पावसाने केली वाताहात
सुरुवातीला पपईचा मळा चांगला बहरलेला दिसत होता. मात्र, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले. याचा परिणाम म्हणून सुमारे २५० पपईच्या झाडांची मुळे सडून झाडे कोलमडली आणि मोठे नुकसान झाले. पहिला व दुसरा तोडा काढण्यात आला. मात्र या पपई मालाला सुरुवातीला ७ ते १० रुपये इतकाच भाव मिळाला.
मजुरी व वाहतूक खर्च वजा जाता अत्यल्प शिल्लक
पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्याने अतिरिक्त खर्च करूनही कसाबसा मळा उभा ठेवला. आतापर्यंत या पिकावर सव्वातीन लाख रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. प्रत्यक्षात फक्त ७५ हजार रुपयांचेच उत्पन्न हाती आले आहे. त्यातूनही मजुरी व वाहतूक खर्चवजा गेल्याने शिल्लक अत्यल्प राहिली आहे.
टोणगाव शिवारात १,६०० पपईच्या झाडांची लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून सुमारे २५० झाडे नष्ट झाली. खते, औषधे, फवारण्या करून मोठ्या खर्चाने मळा वाचवला. आतापर्यंत फक्त ७५ हजार रुपयांचा माल निघाला आहे. भावही अत्यंत कमी मिळत आहे. उरलेल्या पिकातून तरी खर्च निघेल, एवढीच आशा आहे. - संजय बडजावत, टोणगाव, ता. भडगाव जि. जळगाव.
माल जास्त असूनही भाव नसल्याने अडचण
सध्या झाडांवर मोठ्या प्रमाणात पपईचा माल आहे. मात्र बाजारातील कमी भाव आणि उत्पादनात झालेली घट यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
