वाघाचे हल्ले वाढल्याने साधारणतः दोन महिने चालणारा तेंदूपत्ता हंगाम यंदा लवकरच गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी, नागभीड व सिंदेवाही तालुक्यांतील काही तेंदूपत्ता फळीला प्रतिसाद नसल्याने बंद पडल्या. पैशापेक्षा जीव महत्त्वाचा आहे, असे म्हणत नागरिक तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जाणे बंद करत आहेत.
ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना रोजगार देणारा तेंदूपत्ता आजवर मोठा आधार देत आला आहे. ५० वर्षांपासून तेंदूपत्ता संकलनाची प्रक्रिया वनविभाग राबवत आहे. प्रत्येक वनपरिक्षेत्रातील झाडांनुसार लक्ष्य ठरवून तेंदूपत्ता लिलावाची प्रक्रिया वनविभाग डिसेंबर व जानेवारीदरम्यान राबवतो. २००६ च्या वनहक्क कायद्यानंतर पेसा कायदा लागू झाला.
काही भागात वनविभागाचा हस्तक्षेप संपला. या भागातील तेंदूपत्ता यासह गौण वनोपजाची मालकी ग्रामपंचायतींकडे आली. सर्व कुटुंबे तेंदूपत्ता तोडाईसाठी जंगलात पहाटे जातात. दुपारपर्यंत पाने तोडून घरी आणतात. पुडके तयार करून फळीवर नेऊन जमा करतात.
चार तालुक्यात सर्वाधिक तेंदूपत्ता युनिट सुरू
• मूल, ब्रह्मपुरी, नागभीड, बल्लारपूर तालुक्यांतील वनव्याप्त गावांमध्ये यंदा तेंदूपत्ता युनिट सुरू झाले आहे. मात्र, यंदा तेंदूपत्ता हंगाम सुरू असलेल्या वन क्षेत्रातच वाघाचे हल्ले वाढले. अवघ्या सहा दिवसांत सहा जणांचा बळी गेला.
• त्यामुळे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जाण्यास मजूर कचरत आहेत. तेंदूपत्ता हंगामातून आर्थिक आधार मिळतो. मागील वर्षी दीड महिन्यात तेंदूपत्ता हंगाम सुरू होता.
• परंतु, पैशापेक्षा जीव वाचविणे महत्त्वाचे, अशी व्यथा मांडून काही मजुरांनी पर्यायी रोजगार शोधणे सुरू केले आहे.
तेंदूपत्त्यातून वन विभागालाही मोठा महसूल (२०२४)
विडी पाने (गोणी) - ३४७५०.०४
विक्री उत्पादन - ३४७५०.०४
विक्री मूल्य - १०३२१९.२२ (कोटी)
६८ हजार ४५० पोते संकलनाचे लक्ष्य
• चंद्रपूर जिल्ह्यात यंदा ६८ हजार ४५० पोते (स्टैंडर्ड) संकलनाचे लक्ष्य देण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा युनिट विक्रीही चांगली झाली. परंतु, वाघांची संख्या वाढल्याने नागरिकांत दहशत पसरली.
• गावाभोवती जंगल असलेल्या शेतात सहजपणे गेले तरी वाघ व बिबट्यांचे दर्शन होत आहे. त्यातच आता तेंदूपत्ता मजुरांवर हल्ले झाल्याने यंदाचे संकलनाचे लक्ष्य पूर्ण होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ब्रह्मपुरी-नागभीड तालुक्यात १७ युनिट
• ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यात तेंदूपत्त्याचे १७ युनिट सुरू झाले. पण, गतवर्षीप्रमाणे प्रतिसाद नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. तेंदूपत्त्याचे पुडके येत नसल्याने काही युनिट दोन-तीन दिवसांतच बंद करावे लागले.
• खरे तर यंदा मुबलक तेंदूपत्ता उपलब्ध आहे. टेंबराच्या झाडांना खूप फुटवे फुटले आहेत. पण, वाघाच्या दहशतीने गावकऱ्यांचा हक्काचा रोजगार हिरावला आहे.
दर समान नसल्यानेही समित्या निरुत्साही
गावातील वन व्यवस्थापन समित्यांनी तेंदूपत्ता युनिट सुरू केले. व्यापाऱ्यांनीही लिलावातून युनिट घेतले. पुडक्यांच्या दरात समानता नाही. त्यामुळे समित्यांमध्ये यंदा निरुत्साह आहे.
हेही वाचा : तीन महिन्यांत तीन लाखांचा नफा; संभाजीरावांच्या कारल्याच्या आधुनिक शेतीची यशोगाथा