Gudi Padwa 2026 Importance: गुढी पाडव्यापासून म्हणजे गुरूवार, १९ मार्च रोजी शके १९४८ या नवीन वर्षाची सुरुवात अमावास्या समाप्तीनंतर सकाळी ६:५४ पासून होत आहे. त्यामुळे अमावास्या समाप्तीनंतरच गुढी उभी करावी. सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताचे सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी, असे आवाहन पंचागकर्ते मोहन दाते यांनी सोमवारी केले आहे.
१७ मे ते १५ जून दरम्यान ज्येष्ठ अधिकमास येत असल्याचेही दाते यांनी सांगितले. गुढी उभी करणे हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे मंगलमय वातावरण तयार व्हावे याकरिता जे काही करता येण्यासारखे असेल तर सर्व करता येते.
गुढी कशी उभारायची? (Gudi Kashi Ubharavi)
गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे.
गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी. जिथे गुढी उभी करावयाची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. आंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी व हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी, असेही सांगण्यात आले.
जाणून घ्या यावर्षीचे विशेष योग
यावर्षी ५ मे आणि २९ सप्टेंबर रोजी असे दोन अंगारक चतुर्थी योग येत आहेत. तसेच पाच गुरुपुष्यामृत योग अनुक्रमे २३ एप्रिल, २१ मे, १८ जून, १८ फेब्रुवारी आणि १८ मार्च या दिवशी असणार आहेत.
नव्या वर्षात चार ग्रहण भारतात
यावर्षी एक खग्रास सूर्यग्रहण, एक कंकणाकृती सूर्यग्रहण, एक खंडग्रास चंद्रग्रहण आणि एक छायाकल्प चंद्रग्रहण अशी चार ग्रहणे आहेत. मात्र, यापैकी एकही ग्रहण भारतात दृश्यमान होणार नसल्याचे दाते यांनी सांगितले.
नवीन शके १९४८ या संवत्सराचे नाव पराभव संवत्सर असे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी सकाळी घरोघरी गुढ्या उभ्या करून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे. हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहात असल्यास आपल्या घरी ही पूजा करून गुढी उभी करावी. गुढीपूजनाकरिता वेगळा असा विधी नाही. - मोहन दाते, पंचांगकर्ते
अधिक वाचा: गुढीपाडव्यापासून पुढील तीन दिवस वातावरणात बदल; राज्यात 'या' जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा
