छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यात २०२५-२६ या वर्षातील खरीप हंगामात शेतकऱ्याने पुन्हा एकदा कपाशी पिकालाच सर्वाधिक पसंती दिल्याचे स्पष्ट होत आहे. सोयाबीनला दुसरी तर मक्याला तिसरे पसंती शेतकऱ्यांकडून दिली जात असून, कृषी विभागाने गावोगावी शेती शाळा आणि जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन सुरू केले आहे.
तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४५ हजार ५३२ हेक्टर असून, त्यापैकी खरीप हंगामासाठी ४२ हजार १७० हेक्टर क्षेत्र राखीव आहे. रब्बी हंगामासाठी ८ हजार ५७ हेक्टर आणि उन्हाळी हंगामासाठी केवळ १ हजार ८९० हेक्टर क्षेत्र वापरले जाते.
खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कापूस, मूग, मका, उडीद आणि ज्वारी ही पिके घेतली जातात. तालुक्यातील एकूण ४० हजार ९०७ शेतकऱ्यांपैकी ३४ हजार ७७० अल्प व अत्यल्प भूधारक असून केवळ ६ हजार १३६ शेतकरी हे बहुभूधारक आहेत. या वर्षात कपाशी पिकांनाच सर्वाधिक पसंती असून कृषी विभागाच्या सर्वेक्षणात ३० हजार ६४१ हेक्टरवर कपाशीची लागवड होईल.
त्यासाठी तालुक्यात कपाशीचे १ लाख ५३ हजार २०५ पॉकेट उपलब्ध करण्यात आली असल्याचे पंचायत समिती कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी सांगितले. दुसऱ्या क्रमांकावर यंदा सोयाबीनला पसंती दिली आहे ४ हजार ११० हेक्टरवर सोयाबीनची होणार यंदा लागवड असून सोयाबीनच्या ३ हजार १५७क्विंटल बियाण्याची मागणी कृषी विभागाने नोंदविली आहे. मक्याची तिसऱ्या क्रमांकावर पसंती आहे. चार हजार १२ हेक्टरवर मक्याची लागवड होत आहे.
कृषी विभागाचे मार्गदर्शन
कृषी विभागामार्फत स्थानिक पातळीवर शेती शाळा व इतर जनजागृती कार्यक्रम राबवले जात असून शेतकऱ्यांना योग्य वाणांची निवड, वेळेवर पेरणी, खत व कीड नियंत्रणाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे आगामी हंगामात अधिक उत्पादन मिळवण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
वर्षातील खरीप पिकांचे नियोजन (हेक्टरमध्ये)
कपाशी - ३० हजार ६४१
मका - ४ हजार १२
सोयाबीन - ४ हजार २१०
तूर - २९६
मूग - ५६८
उडीद - ४१२
हेही वाचा : खरीप हंगामापूर्वी 'हे' एक काम करा अन् यंदा खतांचा अतिरिक्त खर्च टाळा