Join us

यंदा ऊसाची ४० हजार मेट्रिक टन गाळप घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 10:45 IST

उसाची वाढ न झाल्याने यंदाही साखर हंगाम जेमतेम चालेल, तर मागील काही वर्षांत कमी दर दिलेले कारखाने उसाअभावी बंद ठेवावे लागणार आहेत.

मागील वर्षी उसातील पाणी हटले नसल्याने, तर यंदा पाणी नसल्याने वजनात मोठी तूट येणार असल्याने 'ऊस' शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणार आहे. उसाची वाढ न झाल्याने यंदाही साखर हंगाम जेमतेम चालेल, तर मागील काही वर्षांत कमी दर दिलेले कारखाने उसाअभावी बंद ठेवावे लागणार आहेत.

निसर्ग मागे लागला तर हात धुवून मागे लागतो, असा प्रकार शेतकऱ्यांचा झाला आहे. मागील तीन वर्षे सरासरी व त्यापेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे चांगले आलेले खरीप पाण्यात गेले, तर रब्बीचे उत्पादनही म्हणावे तितके आले नाही. मागील वर्षी तर सरासरीच्या १११ टक्के इतका पाऊस पडला. कधी अतिवृष्टी तर कधी संततधार पाऊस पडल्याने चांगले आलेल्या खरीप पिकांतील पाणी हटले नसल्याने पिकांची काढणी करता आली नाही. शिवाय उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने रब्बी पेरणीसाठी वाफसा झाला नसल्याने उशिराने पेरावे लागले. त्याला अपेक्षित उतारा पडला नाही.

अशीच स्थिती उसाची झाली होती. चार-पाच महिने उसात पाणी राहिल्याने उसाला दशी पडली. त्यामुळे ऊस वजनात भरला नाही. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असूनही जिल्ह्यातील ३७ साखर कारखान्यांचे अवघे १८२ लाख मेट्रिक टन गाळप झाले. यावर्षी पाऊस नसल्याने गरजे इतके पाणी उसाला मिळाले नाही. काही ठिकाणी पाणी असूनही पोषक वातावरण नसल्याने उसाची म्हणावी तितकी वाढ झाली नाही. त्याचा ऊस गाळपाला मोठा फटका बसणार आहे.

यावर्षी शासन १ नोव्हेंबरपासून साखर हंगाम सुरू करण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी असल्याने दिवाळीनंतर साखर कारखान्यांचे गाळप वेग घेईल. यंदा उशिराने सुरू झालेला साखर हंगाम लवकर आटोपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय मागील दोन तीन हंगामांत दर कमी देऊन शेतकऱ्यांना हैराण करणाऱ्या कारखान्यांना शेतकरी ऊस देण्यास धजावण्याची शक्यता कमीच असल्याने असे कारखाने बंद राहतील असे सांगण्यात येते.

वर्ष गाळप (मे. टन)२०१९-२०      ६३ लाख२०२०-२१      १३६ लाख२०२१-२२      २३० लाख२०२२-२३      १८२ लाख२०२३-२४      १४० लाख(२०२३-२४ या नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या वर्षातील गाळप हे अपेक्षित धरले आहे)

पाऊस नसल्याने यंदाच्या ऊस गाळपावर कमालीचा परिणाम होईल. जिल्ह्यातील ३८ साखर कारखाने सुरु करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, उसाअभावी एवढे कारखाने सुरू होतील, असे वाटत नाही. १३० ते १४० लाख मेट्रिक टन गाळप होईल असा अंदाज आहे. - पांडुरंग साठे, साखर सहसंचालक, सोलापूर.

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीशेतीपीकपाऊसपाणी