सोमेश्वरनगर: ऊस लागवड हंगामाचा शुभारंभ १५ जूनच ठेवावा की १ जुलै करावा, आडसाली ऊस लागवडीवर नियंत्रण कसे आणावे आणि खोडवा उसात वाढ कशी करावी, अशा विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी सोमेश्वर कारखान्याने २० मे रोजी सकाळी १० वाजता मुख्य कार्यालयासमोर चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
संचालक मंडळ दरवर्षी धोरण ठरवतेच; मात्र त्यावरून वाद-विवाद झडतात. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतल्यास धोरणे अधिक पारदर्शी ठरणार आहे. सोमेश्वर कारखान्याचे चार तालुक्यात कार्यक्षेत्र असून सतत ऊस क्षेत्रात वाढ होत चालली आहे.
२००६ पूर्वी सलग ४८ वर्षे सोमेश्वर गेटकेनवर अवलंबून होता. मात्र शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे वाढलेला कल, उसाच्या एफआरपीची हमी आणि सोमेश्वरची विश्वासार्हता त्यामुळे सोमेश्वर स्वयंपूर्ण झाला. २००७ ला गाळपक्षमता ५ हजार टन केली होती.
आता ती साडेसात हजार टन प्रतिदिन झाली आहे. तरीही गाळप उरकायला किमान पाच ते सहा महिने जात आहेत. महत्त्वाची समस्या म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांचा आडसाली ऊस लागवडीवरच भर असतो. परिणामी गेले अनेक हंगामात आडसाली ऊस फेब्रुवारी ते मार्चपर्यंत तोडला जातोय.
त्यामुळे उरलेल्या पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा उसाचे तुटताना २० महिन्यांपेक्षा अधिक वय होऊन शेतकऱ्यांचेच प्रचंड नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आडसालीच्या धोरणाबाबत अत्यंत गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
आता पार पडलेल्या हंगामात केवळ आडसाली उसाची १७ हजार एकर लागवड होती. तत्पूर्वीच्या हंगामांमध्येही १६ ते १८ हजार एकर लागवड आडसाली होती. याशिवाय ऊस लागवडीचा शुभारंभ काही शेतकरी १५ जून की १ जुलै यावरही निर्णायक तोडगा आवश्यक आहे.
को ८६०३२ या वाणाला चांगला साखर उतारा असल्याने ऊसतोडीत प्राधान्य दिले जाते. पण त्या धोरणात याचे प्रमाण पन्नास टक्क्यांच्या पुढे गेले असून परिणामी फुले २६५ व अन्य वाण तुटायला जानेवारी-फेब्रुवारी उजाडत आहे.
या धोरणाचाही फेरविचार करावा लागणार आहे. खोडवा उसाच्या लागवडीला प्राधान्य देणे शेतकरी आणि कारखान्याच्याही हिताचे आहे तसेच गेटकेन ऊस आगामी हंगामात किती आणावा याबाबतही शेतकऱ्यांची मते महत्त्वाची आहेत.
अधिक वाचा: सोयाबीनचं घरचं बियाणं पेरताय; अशी करा उगवण क्षमता चाचणी