Join us

राज्यातील 'हा' साखर कारखाना ऊस लागवडीसाठी वापरणार 'एआय' तंत्रज्ञान; कशी कराल नोंदणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:54 IST

AI Sugarcane Farming राज्यातील ह्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता वाढावी यासाठी ऊस शेतीत 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना राबविण्यात येत आहे.

बारामती : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता वाढावी यासाठी ऊसशेतीत 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना राबविण्यात येत आहे.

या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस उत्पादनात अंदाजे ३० ते ४० टक्के वाढ होते तसेच खते व पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत सिद्ध झाली आहे.

यासाठी 'एआय'द्वारे ऊस लागवड करण्यात येणाऱ्या या योजनेत प्रथमतः ६०० सभासदांना सहभाग घेता येईल, अशी माहिती कारखाना अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.

कारखान्याच्या यंदाच्या हंगाम तयारीच्या पार्श्वभूमीवर युनिट नं. १ चे मिल रोलर पूजन कारखान्याचे संचालक सतीश देवकाते यांच्या हस्ते व युनिट नं. २ चे मिल रोलर पूजन संचालक रामचंद्र निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष जाचक यांनी ही माहिती दिली.

हंगामात ३४,०४८ एकर उसाची कारखान्याकडे नोंद आहे. त्याद्वारे १२ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याचे संचालक मंडळाने ठरविल्याचे जाचक म्हणाले.

प्रतिहेक्टर किती खर्च?◼️ एआयचा खर्च प्रतिहेक्टर रु. २५ हजार आहे. यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट रु. ९,२५०, कारखाना रु. ६,७५० चा आर्थिक सहभाग आहे. उर्वरित रक्कम रु. ९,००० योजनेतील सहभागी सभासदांनी कारखान्याकडे भरणा करावयाची आहे.◼️ योजनेसाठी ऊस लागवडीसाठी ड्रिप आवश्यक आहे.◼️ योजनेसाठी अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत असून, त्याकरिता इच्छुक सभासदांनी कारखान्याचे ऊस विकास विभागाकडे संपर्क साधावा.◼️ कार्यक्षेत्रात आडसाली १२,१८४ एकर, पूर्व हंगामी १,८०० एकर, सुरू २,८०० एकर व खोडवा ७,७५० एकर असे एकूण २४,५३४ एकर क्षेत्राची व कार्यक्षेत्राबाहेरील ९,५१४ एकर अशी एकूण ३४,०४८ एकर उसाची कारखान्याकडे नोंद असल्याचे जाचक म्हणाले.

अधिक वाचा: महाराष्ट्रातील 'ह्या' कारखान्याने केला विक्रम; सात वेळा ठरला देशात सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना

टॅग्स :ऊससाखर कारखानेआर्टिफिशिअल इंटेलिजन्सबारामतीलागवड, मशागतपीक व्यवस्थापनठिबक सिंचनशेतीशेतकरी