सोमेश्वरनगर : राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिन्याहून अधिकचा काळ उलटला आहे. यावेळी जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे.
सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी ८.४० टक्क्यांच्या सरासरी साखर उताऱ्याने आज अखेर ५७ लाख ३८ हजार ४९३ मे. टन उसाचे गाळप करून ५० लाख ८ हजार १९४ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.
यंदाच्या गाळप हंगामात खासगी साखर कारखानेऊस गाळपात पुढे आहेत. मात्र, त्यात सहकारी साखर कारखान्यांचा जास्तीचा साखर उतारा ठेवण्याकडे अधिक कल दिसून येत आहे.
निरा खोऱ्यातील तीन सहकारी साखर कारखान्यांनी साखर उताऱ्यात पहिले तीन क्रमांक पटकावले आहेत. चालू गळीत हंगामात राज्यासह जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे.
परंतु साखर कारखान्यांनी वाढवलेल्या स्वतःच्या गाळप क्षमतेमुळे जास्तीत जास्त ऊस गाळपाकडे कल दिसत आहे. वाढवलेल्या गाळप क्षमतेमुळे चालू हंगामात जिल्ह्यातील साखर कारखाने मार्च महिन्यातच बंद करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज अखेर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ५८ लाख ३८ हजार ४९३ टन ऊस गाळप करत ५० लाख ८ हजार १९४ क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन घेतले आहे.
ऊस गळापास खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे, तर साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांनी बाजी मारली आहे. ऊस गाळपात बारामती अॅग्रोने, तर साखर उताऱ्यात सोमेश्वर साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे.
साखर हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना लोटला आहे. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची मुबलक उपलब्धता आहे.
मात्र, सहकारी कारखान्यांच्या भोवती असणाऱ्या सर्वच खासगी कारखान्यांनी स्वतःची गाळप क्षमता वाढवली असून, कार्यक्षेत्राची मर्यादा ओलांडून जादा ऊस दराचे आमिष दाखवत कारखाने एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळवतानाचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यात बारामती अॅग्रो व दौंड शुगर या खासगी कारखान्यांनी नऊ लाख गाळपाचा टप्पा ओलांडला आहे.
जिल्ह्यातील बारामती अॅग्रोने ११ लाख ९ हजार ९३९ मे. टन उसाचे गाळप करून ८ लाख ३३ हजार ६०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.
साखर उतारा
◼️ सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्याचे ध्येय समोर ठेवून ऊस गाळपात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सोमेश्वर कारखान्याने मात्र साखर उताऱ्यात जिल्ह्यात बाजी मारली आहे.
◼️ ११ टक्केचा साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखाना अव्वलस्थानी आहे.
◼️ त्या खालोखाल १०.७९ टक्केचा साखर उतारा ठेवत छत्रपती कारखाना दुसऱ्या
◼️ १०.६१ टक्केचा साखर उतारा ठेवत माळेगाव कारखाना तिसऱ्या क्रमांकावर आहे.
उताऱ्यात सहकारी आघाडीवर
◼️ दौंड शुगरने ९ लाख ४१ हजार ६१० मे. टन उसाचे गाळप करून ७ लाख ८ हजार ५०० पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.
◼️ तर ४ लाख ७७ हजार ६० मे. टन उसाचे गाळप करून ५ लाख २२ हजार १५० साखर पोत्यांचे उत्पादन घेत सोमेश्वर कारखाना तिसऱ्या क्रमांकावर आहे.
◼️ खासगी कारखान्यांनी गाळपात आघाडी घेतली तरी साखर उताऱ्यात मात्र सहकारी कारखाने आघाडीवर आहेत.
अधिक वाचा: सिद्धेश्वर साखर कारखान्याचा ऊस दर अखेर जाहीर; तीन हप्त्यात देणार ऊस बिल, पहिला हप्ता कितीने?
