देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांना विविध पुरस्कार दिले जातात.
तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन,अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित व मानाच्या गुणवत्ता पारितोषिकांचा वितरण समारंभ येत्या ३ जुलै रोजी राजधानी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे संपन्न होत आहे.
ही पारितोषिके केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री श्रीमती निमूबेन बांभनिया आणि माजी केंद्रीय मंत्री व हरियाणातील ऋषीहूड विद्यापीठाचे कुलपती सुरेश प्रभू यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून हरियाणाचे सहकार मंत्री अरविंद कुमार शर्मा, कर्नाटकचे ऊस मंत्री शिवानंद पाटील, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी हे उपस्थित राहणार आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्याबरोबरच टेक्निकल सेमिनार व साखर उत्पादनाशी निगडित भव्य प्रदर्शन याच ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. टेक्निकल सेमिनार २ जुलै रोजी तर प्रदर्शन २ आणि ३ जुलै असे दोन दिवस खुले राहील.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) उस शेतीमधील वापर या विषयावरील परिसंवाद आणि चर्चा सत्राचे अध्यक्ष डॉ. प्रसांत कुमार दास, असिस्टंट डायरेक्टर जनरल (क्रॉप सायन्स), इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चरल रिसर्च, केंद्रीय कृषी मंत्रालय , भारत सरकार हे राहतील.
या विषयावर बोलण्यासाठी मुख्य वक्ते म्हणून बारामती येथील कृषी विज्ञान ट्रस्टचे केंदाचे विश्वस्त प्रतापराव पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या विषयावरील गट चर्चेचे प्रमुख अनिंद्य बॅनर्जी, अॅडवायझर, कृषी मंत्रालय, भारत सरकार, डॉ. पी. गोविन्दाराज, डायरेक्टर आय.सी. ए.आर, शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिटयूट, कोईम्बतूर तामिळनाडू आणि डॉ. आर.बी. डौले, चीफ केन अॅडवायझर, नॅशनल फेडेरेशन ऑफ कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली हे राहतील.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे तज्ज्ञांमार्फत कारखान्यांचे काटेकोरपणे मूल्यांकन केल्यानंतर केंद्रीय सह सचिव (सहकार) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे वर्ष २०२३-२४ साठीची निश्चित केलेली एकूण २५ पारितोषिके राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी यापूर्वीच जाहीर केली आहेत.
यंदाच्या २०२३-२४ वर्षीच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशभरातून १०३ सहकारी साखर कारखान्यांनी भाग घेतला. एकूण २५ पारितोषिकात महाराष्ट्राने एकूण १० पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला असून दुसऱ्या क्रमांकावरील तमिळनाडूला पाच पारितोषिके प्राप्त झाली आहेत.
उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर असून त्याला चार पारितोषिके मिळाली तर चौथ्या क्रमांकावरील गुजरातने तीन पारितोषिके प्राप्त केली. पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांना प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले आहे.
अधिक वाचा: कमी खर्चात गादी वाफ्यावर कशी तयार कराल उसाची रोपे? जाणून घ्या सविस्तर