पुणे : गेल्या वर्षी राज्यात ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असून, राज्य सरकारने त्याची मोठी खरेदी केली आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून दोन महिन्यांसाठी रेशन दुकानात ज्वारीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदी करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार २०२४-२५ या वर्षात ज्वारीचे अतिरिक्त उत्पादन होऊन मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी सरकारने केली आहे.
त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये रेशन दुकानांतून ज्वारीचे प्रत्येकी एक किलोचे वाटप करण्याची सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा विभागाला केली होती.
त्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना त्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दोन महिन्यांसाठी ज्वारीची उचल करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हा पुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत
राज्यातील पुणे शहर, जिल्हा, तसेच सातारा, सांगली, नांदेड, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, लातूर, सोलापूर शहर आणि जिल्हा या बारा जिल्ह्यांसाठी २२ हजार ७६६ टन इतकी ज्वारी लागणार आहे.
तसेच हिंगोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यांसाठी ४ हजार १३ टन इतकी ज्वारी लागणार आहे. या जिल्ह्यांसाठी अकोला येथून तर अन्य १२ जिल्ह्यांसाठी बुलढाणा येथून धान्य उचलण्याच्या कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे शहरासाठी १३७४ टन तर जिल्ह्यासाठी २८४४ असे ४२१८ टन इतके ज्वारीचे धान्य लागणार आहे.
अधिक वाचा: अतिपावसाने खरवडलेल्या शेतजमिनींना मनरेगातून मदत; काय आहेत निकष? कसा घ्याल फायदा?