सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ चा गळीत हंगाम सोमवारी यशस्वीपणे पूर्ण झाला.
सुमारे १४३ दिवस, म्हणजेच जवळपास पाच महिने अखंड सुरू असलेल्या या हंगामात कारखान्याने उच्चांकी १२ लाख ९८ हजार टन ऊस गाळपाची नोंद केली.
संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण झाल्यानंतरच कारखाना प्रशासनाने हंगाम बंद करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी रात्री गव्हाणीत नारळ टाकून पारंपरिक पद्धतीने हंगामाची सांगता करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक सुनील भगत, ऋषिकेश गायकवाड, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, अधिकारी, ऊसतोडणीकामगार उपस्थित होते.
साखरेचा सरासरी उतारा, उपपदार्थ व एकूण साखर उत्पादनाबाबतची अंतिम आकडेवारी पुढील दोन दिवसांत जाहीर होणार आहे.
दरम्यान, हंगाम संपल्याच्या आनंदात ऊसतोडणी कामगारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. चार तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू झाला होता.
सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा दूरदृष्टिकोन, सभासद, संचालक मंडळ, ऊस वाहतूकदार आणि कामगार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हंगामाची यशस्वी सांगता झाली.
काही कामगारांनी आपल्या बैलांना गुलाल लावून कारखाना परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
◼️ हंगाम संपल्यामुळे परिसरात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
◼️ हंगामात सर्वाधिक ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांनी आपला ठसा उमटवला.
◼️ यामध्ये बबन नारायण भिलारे व जनाबाई बबन भिलारे या पती-पत्नीने ६०० टन ऊसतोड करून प्रथम क्रमांक पटकावला.
◼️ अनिल बबन भोसले यांनी ५३३ व दिलीप रोहिदास भोसले यांनी ५२० टन ऊस या हंगामात तोडला.
◼️ हंगाम यशस्वी करण्यासाठी मुकादम सचिन माने, रघुनाथ चव्हाण, दिलीप भोसले, नाना भोसले आणि दादासो अर्जुन माने यांनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा: कृषी अवजार बँक सुरू करण्यासाठी मिळणार आता २४ लाखांपर्यंत अनुदान; वाचा सविस्तर
