अवसरी: दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांनी सन २०२३-२४ सत्रासाठी "वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना" पुरस्कार दिला आहे.
हा सन्मान केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांनी गुरुवारी राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान केले.
या सोहळ्यात केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार राज्य मंत्री निमुबेन बांभनिया, हरयाणातील ऋषीहूड विद्यापीठाचे कुलपती व माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, हरयाणाचा सहकार मंत्री डॉ. अरविंद कुमार शर्मा, उत्तर प्रदेश राज्याचे ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.
भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले, आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊसवाढ योजना, कर्ज परतफेड, व्याज तसेच खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊसदर आर्दीच्या कामगिरीमुळे पुरस्कार मिळाला.
उत्पादक, सभासदांची साथसंस्थापक व माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शनामुळे तसेच संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १६ असे एकूण २९ पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
सात वेळा पुरस्कारदेशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ७ वेळा मिळविणारा देशातील एकमेव साखर कारखाना आहे. अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
अधिक वाचा: पाच टक्के नजराणा भरून 'त्या' जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर