पीककर्ज वाटपामध्ये सलग चौथ्या वर्षी पुणे जिल्ह्याने उच्चांक गाठला असून २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात ७ हजार ९२० कोटी रुपये इतके पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
यंदा ६ हजार ३७० कोटी रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या तुलनेत १ हजार ९५० कोटी रुपये अधिक कर्जवाटप करून उद्दिष्टाच्या १२४ टक्के कामगिरी झाली आहे. यामध्ये मत्स्यव्यवसाय व पशुपालनासाठी २० कोटी रुपये कर्जपुरवठा करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६ हजार ९३० कोटी, तर त्यापूर्वी २०२२-२३ मध्ये ५ हजार २० कोटी रुपये पीककर्ज वाटप झाले होते. तत्पूर्वी २०१५-१६ मध्ये ३ हजार ५०६ कोटी ३१ लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले होते. त्यानंतर हा विक्रम थेट २०२१-२२ मध्ये मोडण्यात आला आणि त्यानंतर सलग चार वर्षे पीककर्ज वाटपाचा नवीन विक्रम होत आहे.
गेली चार वर्षे वार्षिक पतपुरवठा आराखडा योजनेनुसार ठरविण्यात आलेले लक्ष्य पार करून जिल्ह्यात कर्जवाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये ८३ हजार २९७ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.
प्रत्यक्षात २ लाख ५ हजार २५९ कोटी, २०२२-२३ मध्ये १ लाख १७ हजार ७१६ कोटींच्या उद्दिष्टासमोर २ लाख ७० हजार ९२५ कोर्टीचे आणि २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात ३ लाख १ हजार ६०० कोटींच्या उद्दिष्टासमोर २ लाख ७३ हजार ९७कोटी कर्जवाटप झाले.
तर यावर्षी मार्चअखेर ३ लाख ५३ हजार ५२२ कोटींचे विक्रमी कर्जवाटप झाले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी २०२५-२६ च्या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याचा पतपुरवठा आराखडा ३ लाख ६२ हजार कोटींचा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बँका | बँका उद्दिष्ट (कोटींत) | प्रत्यक्ष वाटप (कोटींत) | टक्के |
सरकारी बँका | १८७१ | ३४१३ | १८२.४२ |
खासगी बँका | १३१११ | १५१० | ११.५२ |
जिल्हा बँक | ३१७५ | २९९१ | २४.२० |
एकूण | ६३७० | ७९२० | १२४.३३ |
उद्दिष्टपूर्ती केली
• जिल्ह्यात यंदा ६ हजार ३७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तर प्रत्यक्षात ७ हजार ९२० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले असून एकूण उद्दिष्टाच्या हे वाटप १२४ टक्के अधिक आहे.
• याव्यतिरिक्त कृषी मुदत कर्जवाटपामध्येही ९ हजार ४६० कोटी रुपये कर्जवाटप झाले असून पीककर्ज व कृषी मुदत कर्ज मिळून कृषी क्षेत्रासाठी ३१ मार्चपर्यंत एकूण १७ हजार ३८० कोटी रुपये कर्जवाटप करून १०७ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिली.
हेही वाचा :रेबिज बाधित जनावरांचे दूध सेवन केल्यास रेबिज होतो का? वाचा काय सांगताहेत तज्ञ