कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कृषी ड्रोन कर्ज योजना सुरू केली आहे. तरुणांसह सहकारी संस्थांसाठी चार लाख तर कृषी पदवीधरांसाठी पाच लाख अनुदान मिळणार आहे.
पाच वर्षे कर्जफेडीची मुदत असलेल्या या योजनेमध्ये कर्जदारांनी दहा समान हप्त्यात परतफेड करावयाची आहे. बाजारपेठेत असलेल्या विविध कंपन्यांच्या कृषी ड्रोनची किंमत साधारणतः दहा ते बारा लाख रुपये आहे.
कृषी ड्रोन अनुदान योजनेंतर्गत इयत्ता दहावी पास व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला व इतर सहकारी संस्थांना अनुदान मिळणार आहे.
शेतकरी उत्पादक संस्थांना ७५ टक्के व जास्तीत जास्त साडेसात लाखांपर्यंत अनुदान मिळेल. शासकीय संस्थांना १०० टक्के म्हणजेच १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना व संस्थांना नवीन उद्योगाची संधी प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
योजनेची उद्दिष्टे
◼️ शेतकऱ्याचा वेळ व पैशाच्या बचतीसह पीक उत्पादन वाढ.
◼️ ग्रामीण सुशिक्षित बेरोजगार व कृषी पदवीधारकांना व्यवसायाची नवीन संधी.
◼️ सरकारी अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे.
◼️ खते, पाणी, बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशकांचा योग्य व कमीत कमी वापर.
◼️ पीक विमा दाव्यासाठी ड्रोनच्या आकडेवारीचा वापर.
केडीसीसी बँकेनेतंत्रज्ञानामध्ये गरूडझेप घेतली असून, बँकिंगशी संबंधित सर्वच दैनंदिन कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. विकास सेवा संस्थांचे संगणकीकरणही लवकरच पूर्ण होत असून, शेतीमधील तंत्रज्ञानाच्या वापराच्या उद्देशाने बँकेने हे धोरण स्वीकारलेले आहे. - हसन मुश्रीफ, अध्यक्ष, जिल्हा बँक
अधिक वाचा: शेतरस्ते होणार आता कायमचे अतिक्रमणमुक्त; प्रत्येक रस्त्यासाठी मिळणार विशिष्ट नंबर