सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर, पुणे जिल्ह्यातील इंदापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील शेतकऱ्यांनी सर्वाधिक केळी निर्यात करण्याचा विक्रम केला आहे. विशिष्ट चव व जास्त दिवस टिकवण क्षमता ही येथील केळीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
उजनी धरणाच्या निर्मितीनंतर उसाचे आगार म्हणून ओळख असणाऱ्या उजनी लाभक्षेत्रात मागील दहा वर्षात केळी बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे येथील शेतीची नवीन ओळख निर्माण झाली आहे. येथील केळीला पुणे, मुंबई, उत्तर भारतासह आखाती देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्रातून सर्वात जास्त केळीची निर्यात होत असलेल्या जळगाव जिल्ह्याला आता उजनी लाभक्षेत्रातील केळीने मागे टाकले आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळीला जीआय मानांकन मिळाले आहे त्याप्रमाणेच उजनी लाभक्षेत्रातील केळीला जळगाव जिल्ह्यातील केळीपेक्षा वेगळे वैशिष्ट्य तसेच नैसर्गिक परिस्थिती केळी उत्पादनास अधिक अनुकूल असल्याने येथे संपूर्ण वर्षभर केळीची लागवड आणि उत्पादन शक्य होत असल्यामुळे 'उजनी'ची केळी म्हणूनच मानांकन मिळाले पाहिजे, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.
जीआय मानांकन निर्यातीस लाभदायक...
• भौगोलिक चिन्हांकन मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात. अशा नोंदणीकृत कृषी मालास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रेडिंग होण्यास मदत होते. व्यापारी चिन्हाला बाजारपेठेत महत्त्व असते. तेच महत्त्व कृषीमालाच्या भौगोलिक चिन्हांकनासह असते.
• अशा नोंदणी केलेल्या उत्पादकाला जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळून त्याच्या उन्नतीस हातभार लागतो. भौगोलिक मानांकन प्राप्तीमुळे भारतीय कृषी निर्यातीस जागतिक बाजारपेठेत निश्चितच लाभ मिळेल, असे कुगावचे केळी उत्पादक धुळाभाऊ कोकरे यांनी स्पष्ट केले.
करमाळा तालुक्यातील कंदर, वाशिंबे आणि माढा तालुक्यातील टेंभुर्णी ही गावे विशेषतः निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध झाली आहेत. यामुळेच देशातील प्रमुख केळी निर्यातदार कंपन्यांनी या भागात आपली कार्यालये स्थापन केली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पॅकिंग आणि आंतरराष्ट्रीय निकषांनुसार केळी प्रक्रिया यामुळे वाशिंबे, कंदर, टेंभुर्णी येथील केळी जागतिक स्तरावर पोहोचत आहेत. - सुयोग झोळ, वाशिंबे, ता. करमाळा जि. सोलापूर.
