Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या रब्बी पेरणी क्षेत्रात यंदा तब्बल चार लाख हेक्टरची तफावत; पेरणीचा वेग अपेक्षेपेक्षा मंदावलेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:35 IST

Maharashtra Rabi Season : राज्यात यंदाच्या रब्बी हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याचा स्पष्ट परिणाम पेरणी क्षेत्रावर दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा संपत असतानाही पेरणीचा वेग अपेक्षेपेक्षा मंदावलेला आहे.

सागर कुटे

राज्यात यंदाच्या रब्बी हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याचा स्पष्ट परिणाम पेरणी क्षेत्रावर दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा संपत असतानाही पेरणीचा वेग अपेक्षेपेक्षा मंदावलेला आहे.

राज्यात सध्या १६ लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली असून, याच काळात गतवर्षी २० लाख ७१ हजार ८१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. म्हणजेच यंदा जवळपास चार लाख हेक्टरचे अंतर अद्याप भरून न निघाल्याचे चित्र आहे.

कृषी तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वेळोवेळी पडणारा पाऊस, जमिनीतील आर्द्रतेतील अस्थिरता आणि काही भागांतील थंडीचे अनिश्चित स्वरूप यामुळे शेतकरी थांबून पेरणी करण्याच्या भूमिकेत होते. त्यामुळे धान्य, कडधान्य आणि तीळवर्गीय पिकांच्या पेरणीचा वेग लक्षणीयरीत्या मंदावला आहे.

आत्तापर्यंत पेरणीची अधिकृत आकडेवारी (विभागनिहाय)

कोकण - २,८०६ नाशिक -  ७१,२४५ पुणे - ४,१५,६८८ कोल्हापूर - २,४५,४९७ छ. संभाजीनगर - १,७०,३२४ लातूर - ५७२,९४१ अमरावती - १,५१,७२२ नागपूर - २०,८३८ 

आठवडा महत्त्वाचा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमानात किरकोळ घट होणार आहे. त्यामुळे गहू, हरभरा आणि ज्वारी पेरणीला गती मिळू शकते. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना आंतरपिक पद्धती, पेरणी व्यवस्थापन आणि संरक्षणात्मक उपायांसंदर्भात मार्गदर्शन सुरू केले आहे.

उशिरा काढणीमुळे पेरणी पुढे ढकलली !

• लातूर, पुणे आणि कोल्हापूर विभागात पेरणीचा वेग तुलनेने समाधानकारक असला तरी नागपूर व कोकण विभागात अपेक्षेपेक्षा कमी पेरणी झाल्याचे दिसते.

• विदर्भातील अनेक भागात नोव्हेंबरच्या सुरुवातील बरसेल्या पावसामुळे पिकांची उशिरा काढणी सुरू झाली. परिणामी, रब्बी पेरणी ढकलली गेल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : डाळिंबवाल्या अशोकरावांना मोसंबीची गोडी; विना मशागत तंत्राने बागेत अर्धा-अर्धा किलो फळांची जोडी

टॅग्स :रब्बी हंगाममहाराष्ट्रशेतीशेतकरीपीकरब्बीशेती क्षेत्रलागवड, मशागत