जयसिंगपूर : ऊसशेतीतून अर्थकारण चालणाऱ्या शिरोळ तालुक्यात सध्या ऊस रोपवाटिकाधारकांची लगबग सुरू आहे. सध्या ऊस हंगाम सुरू असून शेतामध्ये ऊसतोडणी पूर्ण होणाऱ्या शेतकऱ्यांकडून नवीन ऊस लागवडीची लगबग सुरू झाली आहे.
तालुक्यात ६०० हून अधिक ऊस रोपवाटिका असून या रोपांना चांगली मागणी असल्याने गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा व्यवसाय मोठा व्यवसाय बनला आहे. रोपांना मागणी वाढल्याने रोपवाटिकांमधून रोपे तयार करण्याचे काम जोमाने सुरू आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी रोपे लावण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने शेतकऱ्यांमध्ये जागृती होत आहे. शिरोळ तालुक्यातून त्याला सुरुवात झाली.
उसाच्या रोपांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक उसाचे उत्पन्न घेतले जाते. दसरा, दिवाळीवेळी रोपांना मागणी नसते मात्र, डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात मागणी होते.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून तालुक्यात जवळपास ६०० हून अधिक रोपवाटिका तयार झाल्या आहेत. तमदलगेसह निमशिरगाव, शिरोळ, उमळवाड, दानोळी, उदगाव, हेरवाड, तेरवाड यासह तालुक्यात लहान मोठ्या रोपवाटिका आहेत.
ऊस बियाणे, तोडणी कामगार, वाहतूक, रोपे तयार करण्यासाठी लागणारे मजूर, रोपांची वाहतूक करण्यासाठी वाहन, रोप तयार करण्यासाठी ट्रे, कोकोपीट, औषधे, लागवड यामधून मोठी उलाढाल होत आहे.
सध्या ऊस हंगाम सुरू असून तोडणी झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून नवीन ऊस लागवडीची लगबग सुरू आहे. त्यामुळे रोपवाटिकांतून रोपांची मागणी वाढली आहे.
महाराष्ट्रासह, गुजरात, तेलंगणा व कर्नाटक राज्यात रोपांना मोठी मागणी असते. साधारणपणे ८६०३२, ०२६५, १००१, १८०८४ या ऊस रोपांची सर्वाधिक विक्री होते.
वर्षभरात साधारण आठ महिने हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतो. त्यामुळे तालुक्यात रोपवाटिकेच्या माध्यमातून मोठे अर्थकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीमुळे रोपांना मागणी नसल्यामुळे जवळपास सव्वालाख रोपे पडून होती. ऊस हंगाम सुरू झाल्यामुळे रोपांची मागणी वाढली आहे. तयार रोपांची लागवड केल्यास उसाचा कालावधी कमी होत असल्याने शेतकरी रोप लावणीला प्राधान्य देत आहेत. - दिलीप कोले, उमळवाड रोपवाटिकाधारक
अधिक वाचा: Phule Sugarcane 13007 : साखर उत्पादनात ८६०३२ पेक्षा सरस असणारी उसाची नवीन जात आली; वाचा सविस्तर