शासनाने दोन वर्षांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र, पात्र असूनही तांत्रिक अडचणीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित होते. त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, शासनाकडून कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समिती व नाफेडला १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती शेतकरी ३५० रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता; परंतु काही तांत्रिक अडचणी व कागदपत्रांची अपूर्तता यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते.
आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून लेखी निवेदन दिले होते. शासनाने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला असून २१० शेतकऱ्यांना ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.