Join us

पशुधनाच्या वैरणीचा प्रश्न होतोय गंभीर; चारा वाहतूक बंदीचे जिल्हधिकार्‍यांनी काढले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 12:21 IST

भविष्यात चारा टंचाई परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

यावर्षी लातूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने खरीप सह रब्बी हंगामात जनावरांसाठी मुबलक चार्‍याची उपलब्धता झाली नाही. पर्यायाने आगामी तीन महिन्यांचा चारा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.

भविष्यात चारा टंचाई परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी निर्गमित केले आहेत.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन लातूर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिस्क रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात किंवा लगतच्या राज्यात वाहतूक करण्यास मनाई करण्यात येत आहे.

हा आदेश निर्गमित करण्यात आल्याच्या दिनांकापासून पुढील सहा महिन्याच्या कालावधीकरिता लागू राहील, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी निर्गमीत केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सध्या राज्याच्या अनेक भागात चारा पानी प्रश्न गंभीर होत असून यामुळे जनावरांच्या बाजारात देखील पशुधनाची विक्री वाढली आहे. लाख भर रुपयांची बैल जोड अवघी ७० - ७५ हजारांत विकली जात आहे. ज्यांच्याकडे मुबलक पाणी आणि चारा आहे असे व्यापारी ही जनावरे खरेदी करत आहे. 

जनावरांच्या बाजारात पशुधन विक्री करिता आणलेले शेतकरी सांगतात की, "आपण कसेही जगू मात्र या मुक्या जीवांना कसे जगविणार" यामुळे विक्री करत आहोत. तसेच खर्च वाढले आहे उत्पन्न कमी मिळाले आता उन्हाळा काढायचा पुढे परत जमिनीची मशागत आणि लागवड असा खर्च येणार त्यासाठी हे पैसे ठेवावे लागतील. असेही शेतकरी सांगतात.

टॅग्स :दुष्काळदुग्धव्यवसायमराठवाडापाणी टंचाईलातूर