अनुदानाबाबतचा जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर येथील तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी चक्क मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथे मंगळवारी एका शेतात पाहणीदरम्यान प्रकार घडला होता. या प्रकाराची कृषी विभागाने बुधवारी गंभीर दखल घेतली असून तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठविला आहे.
याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांनी दिली. मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे मंगळवारी गोगरी शिवारात एका पाहणीसाठी गेले होते. दरम्यान, शेतकरी ऋषिकेश पवार तेथे आले. त्यांनी दोन वर्षांपूर्वी तीन एकरावर फळबाग लागवड केली होती. फळबाग अनुदानसाठी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता.
फळबाचे अनुदान कधी मिळेल याबबत जाब विचारला, तेव्हा तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी पवार यांच्या अंगावर धावून त्यांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, शेतात पडलेल्या मातीच्या ढेकळानेही मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल कृषी विभागाने घेतली असून, महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९७९ अंतर्गत कलम ८ नुसार कृषी अधिकारी कांबळे यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रस्ताव कृषी सहसंचालकांकडे पाठविला आहे.
तालुका कृषी अधिकारी सचिन केलेल्या गैरवर्तनाची दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव कृषी सहसंचालकांकडे पाठविला आहे. - अनिसा महाबळे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम.
