नानासाहेब जठार
अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात बंदिवानांच्या कष्टाने शेती व पशुपालनातून ६७ लाखांचे उत्पादन घेतले आहे.
विसापूर कारागृहाच्या ९५ एकरांवर शेती केली जाते. ४०० कैद्यांची क्षमता असणाऱ्या विसापूर कारागृहात सध्या २६१ कैदी शिक्षा भोगत आहेत. या कारागृहाच्या शेतीत पिकणारा भाजीपाला मुंबई, ठाणे, येरवडा व नाशिक कारागृहात मागणीप्रमाणे पाठविला जातो. कारागृहाच्या पशुपालन विभागात लहान मोठ्चा २० गायी, बैल व गोन्हे २५ व लहान वासरे १०, असे एकूण ५५ जनावरे आहेत.
शेळीपालन विभागात लहान-मोठ्या ६६ शेळ्या व ४ बोकड आहेत. कारागृहाचे कामकाज महानिरीक्षक सुहास वारके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधीक्षक सुनील कुंवर व तुरुंग अधिकारी संजय साबले हे पाहतात. कारागृहाची शेतीचे कामकाज विविध भागात विभागून हवालदार बाळकृष्ण शिर्के, कुंडलिक साबळे, एकनाथ गांधले, राजाराम वाघ, सुभाष साबळे, भगवान पोटे, प्रशांत बर्गे हे पाहतात.
कारागृहाच्या शेतीत भाजीपाल्यासह ऊस, तूर, गहू व जनावरांची चारापिके घेतली जातात. कारागृहात शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध नसल्याने आतापर्यंत परंपरागत पद्धतीने बैलांकडूनच शेतीची मशागत केली जात होती. मात्र, मार्चमध्ये शासनाने नवीन ट्रॅक्टर दिल्याने शेतीकामात सुधारणा होणार आहे.
कैद्यांना ६७ रुपये मजुरी
कारागृहात सजा भोगत असलेल्या कैद्यांना दैनंदिन ६७ रुपये मेहनताना दिला जातो. या रकमेचा वापर कैदी आपल्या मुलांचे शिक्षण व कुटुंबाचे खर्चात हातभार लावण्यासाठी घरी पाठवतात. त्यांना दैनंदिन खर्चासाठी आवश्यकता भासल्यास या रकमेतून ते आपली गरज भागवतात.